

रायपूर : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर शुक्रवारी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव (३७ चेंडूंत नाबाद ८२ धावा) आणि डावखुरा इशान किशन (३२ चेंडूंत ७६ धावा) यांचे वादळ घोघांवले. या दोघांनी केलेल्या अर्धशतकी झंझावातामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. त्यामुळे भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७ गडी व २८ चेंडू राखून धुव्वा उडवला.
रायपूर येथे झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य भारताने १५.२ षटकांत अवघ्या तीन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज गाठले. मुख्य म्हणजे दुसऱ्या षटकात भारताची २ बाद ६ अशी स्थिती होती. मात्र तेथून इशान व सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची घणाघाती भागीदारी रचली. किशनने ११ चौकार व ४ षटकारांसह २१ चेंडूंतच अर्धशतक साकारले, तर सूर्यकुमारने ९ चौकार व ४ षटकारांच्या आतषबाजीसह तब्बल २३ डावांनंतर अर्धशतकाची वेस ओलांडली. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून आता रविवारी तिसरी लढत खेळवण्यात येईल. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनर (नाबाद ४७) व रचिन रवींद्र (४४) यांनी दमदार फटकेबाजी केली होती.
मायदेशात रंगणारी आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतासाठी विश्वचषक स्पर्धेची पूर्वपरीक्षा आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत नुकताच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. यामध्ये न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली. मात्र आता लक्ष पूर्णपणे टी-२० सामन्यांकडे वळले आहे. भारतीय संघ अनुक्रमे २१, २३, २५, २८ व ३१ जानेवारी या दिवशी न्यूझीलंडशी अनुक्रमे पाच सामने खेळणार आहे. मग ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. २०२४मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. त्यामुळे भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.
मुख्य म्हणजे गेल्याच महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन गिल भारताचा उपकर्णधार होता. त्या मालिकेत भारताने ३-१ असे यश संपादन केले. मात्र आता गिल भारतीय संघाचा भाग नाही. तसेच विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केलेली असून तिलक वर्मा या मालिकेतील किमान तीन सामन्यांना मुकणार आहे, तर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी रवी बिश्नोई व श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इशान किशनचेसुद्धा दोन वर्षांनी संघात पुनरागमन झाले. त्याने अखेर या संधीचे सोने केले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : २० षटकांत ६ बाद २०८ (मिचेल सँटनर नाबाद ४७, रचिन रवींद्र ४४; कुलदीप यादव २/३५) पराभूत वि. g भारत : १५.२ षटकांत ३ बाद २०९ (सूर्यकुमार यादव नाबाद ८२, इशान किशन ७६, शिवम दुबे नाबाद ३६)
सामनावीर : इशान किशन