IND vs NZ 4th ODI: हेन्रीपुढे भारताची हाराकिरी! चौथ्या सामन्यात अवघ्या ८९ धावांतच खुर्दा; २४४ धावांनी दारुण पराभव

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने (२७ धावांत ६ बळी) केलेल्या भेदक माऱ्यापुढे भारताची भंबेरी उडाली. हेन्रीपुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली व संपूर्ण संघ २६.४ षटकांत ८९ धावांतच गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तब्बल २४४ धावांनी दारुण पराभव केला.
IND vs NZ 4th ODI: हेन्रीपुढे भारताची हाराकिरी! चौथ्या सामन्यात अवघ्या ८९ धावांतच खुर्दा; २४४ धावांनी दारुण पराभव
IND vs NZ 4th ODI: हेन्रीपुढे भारताची हाराकिरी! चौथ्या सामन्यात अवघ्या ८९ धावांतच खुर्दा; २४४ धावांनी दारुण पराभवX
Published on: 

माऊंट माँगानुइ : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने (२७ धावांत ६ बळी) केलेल्या भेदक माऱ्यापुढे भारताची भंबेरी उडाली. हेन्रीपुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली व संपूर्ण संघ २६.४ षटकांत ८९ धावांतच गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तब्बल २४४ धावांनी दारुण पराभव केला. याबरोबरच न्यूझीलंडने पाच लढतींच्या मालिकेतील आव्हान कायम राखले असून पाचवा सामना रविवारी खेळवण्यात येईल.

बे ओव्हल येथे झालेल्या या लढतीत हेन्रीच्या भेदक गोलंदाजीमुळे २०१९च्या विश्वचषक उपांत्य सामन्यातील कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत विल यंगच्या १०८ चेंडूंतील शानदार १२५ धावांच्या जोरावर ५० षटकांत सर्व बाद ३३३ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर भारताचे रथी-महारथी एकामागून एक माघारी परतल्याने भारताला विजयी आघाडी घेता आली नाही. भारताचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला. यापूर्वी २०००मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताला २४५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही भारतीय संघ मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. आता पाचवी लढत जिंकून भारत मालिकेवरही कब्जा करणार की न्यूझीलंड मालिकेत बरोबरी साधणार, हे पाहणे रंजक ठरेल. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर पहिल्या दोन लढती भारताने जिंकल्या.

दरम्यान, नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर येथे भारताच्या न्यूझीलंडवारीला प्रारंभ झाला होता. २२ ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने टी-२० मालिकेत ३-२ अशी बाजी मारली. या दौऱ्यात ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा देखील समावेश आहे. आता टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू आहे. त्यामुळे एकीकडे भारतातील चाहते दिवाळी साजरी करत असतानाच त्यांचे न्यूझीलंडमध्येही लक्ष लागून आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कारकीर्दीतील हा अखेरचा न्यूझीलंड दौरा आहे.

यंगचे शानदार शतक

तत्पूर्वी, विल यंग आणि टिम सेईफर्ट यांनी न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२ षटकांत ८५ धावा जोडल्या. सेईफर्टने ४८ चेंडूंत ५८ धावा केल्या. त्याने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. यंगला सुरुवातीला दोनदा जीवदान मिळाले. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी त्याचे झेल सोडले. त्याचा पुरेपूर फायदा घेत यंगने ११० चेंडूंत १२५ धावांची खेळी केली. त्याने ४९ चेंडूंत अर्धशतक आणि पुढील ५० धावा अवघ्या ३९ चेंडूंत पूर्ण केल्या. रोहितने फिनची ३० चेंडूंतील ४१ धावांची खेळी संपुष्टात आणताना अफलातून झेल घेतला. मात्र यंगला भारताचे गोलंदाज रोखू शकले नाही. भारताकडून अक्षर पटेलने १० षटकांत ३९ धावा देत प्रभावी गोलंदाजी केली. अखेरच्या १० षटकांत न्यूझीलंडला केवळ ६८ धावा करता आल्या.

प्रारंभीच तीन धक्के

हेन्रीने पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीला हादरवले. रोहित उंच उसळणाऱ्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्यानंतर कोहली अवघ्या चार चेंडूंनी त्रिफळाचीत झाला. कर्णधार श्रेयस अय्यरही पायचीत झाल्याने भारताची अवस्था पहिल्याच षटकात ० बाद ३ अशी झाली. शुभमन गिलसह अन्य काही खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी गेल्याने श्रेयस भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पहिल्याच लढतीत तो सपशेल अपयशी ठरला.

गिलच्या जागी संधी लाभलेला ऋतुराज गायकवाडही लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था ९ धावांत चार बाद अशी झाली. किशन आणि अक्षर यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॅथ्यू फिशरने अक्षरला बाद केले. त्यानंतर हेन्रीने किशनचा त्रिफळा उडवला. भारताची ६१ धावांत सहा बाद अशी अवस्था झाल्याने पराभव स्पष्ट झाला. हेन्रीनेच गुर्नूर ब्रारला बाद करून भारताचा डाव २६.४ षटकांत अवघ ८९ धावांत गुंडाळला. आता रविवारी याच स्टेडियमवर पाचवी लढत होईल.

हे माहीत आहे का?

* भारताने एकही धाव न करता पहिल्या तीन विकेट गमावण्याचा नकोसा विक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा भारत हा दुसराच संघ ठरला आहे. मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात रोहित, विराट आणि श्रेयस यांना बाद करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला.

* एकदिवसीय प्रकारात पहिल्याच षटकात तीन बळी मिळवण्याचा पराक्रम सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने केला होता. १९९७ मध्ये लाहोर येथे पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याने पहिल्याच षटकात तीन फलंदाजांना बाद केले होते. सईद अन्वर, आमिर सोहेल, इजाज अहमद हे त्याचे बळी होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)