IND vs NZ 1st Test : ...म्हणूनच कसोटी अनिर्णित राखणे योग्य! कर्णधार गिलकडून निर्णयाबाबत स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने बेसिन रिझर्व्ह मैदानावरील खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली. पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून गोलंदाजांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे भारताला मोठी आघाडी मिळवूनही विजय मिळवता आला नाही, असे गिलने स्पष्ट केले.
IND vs NZ 1st Test : ...म्हणूनच कसोटी अनिर्णित राखणे योग्य! कर्णधार गिलकडून निर्णयाबाबत स्पष्टीकरण
IND vs NZ 1st Test : ...म्हणूनच कसोटी अनिर्णित राखणे योग्य! कर्णधार गिलकडून निर्णयाबाबत स्पष्टीकरणX| BCCI
Published on: 

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने बेसिन रिझर्व्ह मैदानावरील खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली. पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून गोलंदाजांना अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे भारताला मोठी आघाडी मिळवूनही विजय मिळवता आला नाही, असे गिलने स्पष्ट केले.

शेवटचा एक तासाचा खेळ शिल्लक असताना दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबत विचारले असता गिल म्हणाला, “खेळपट्टीवर गोलंदाजांना थोडी अधिक मदत मिळाली असती, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. आमचे वेगवान गोलंदाज खूप थकले होते. त्यांनी सामन्यात जवळपास ५० षटके गोलंदाजी केली होती. त्यातच दुसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांवर आली असून, पुढील दिवशी प्रवासही करायचा होता. त्यामुळे गोलंदाजांना विश्रांती देणे आवश्यक होते.”

“आणखी पाच ते दहा षटके गोलंदाजी केली असती, तरी फारसा फरक पडला नसता. त्यामुळे सर्व गोलंदाजांना ताजेतवाने ठेवण्याचा निर्णय घेतला,” असेही गिलने स्पष्ट केले. सपाट खेळपट्टीवर १० बळी मिळवणे कठीण असल्याची जाणीव भारतीय संघाला होती. तरीही काही संधी निर्माण करण्यात भारताला यश आले. त्यामुळे क्षेत्ररक्षणातील संघाच्या कामगिरीवर आपण समाधानी असल्याचे गिलने सांगितले. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या कसोटीत खेळपट्टीकडून गोलंदाजांना अधिक मदत मिळेल, अशी अपेक्षा गिलने व्यक्त केली.

लाळेवरील बंदी कधी काढणार?

आपण आता कोरोना काळापासून खूप पुढे आलो आहोत. चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्यावर बंदी घालणारा एक नियम होता. आता ७-८ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही मला समजत नाही की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर बंदी का आहे, असा प्रश्न गिलने विचारला. “मला वाटते की २५-३० षटकांच्या खेळानंतर चेंडू खूप मऊ झाला होता. न्यूझीलंडनेही याबद्दल तक्रार केली होती. आम्ही इंग्लंडमध्येही असेच पाहिले होते,” असेही गिलने सांगितले.

सिराजला वगळण्याचा निर्णय कठीण

“सिराज एक उत्तम खेळाडू आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकत्रच पदार्पण केले होते आणि भारतासाठी खेळण्यापूर्वीपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे, त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय माझ्यासाठीही खूप कठीण होता. पण कधीकधी तुम्हाला हे पाहावे लागते की कोणते गोलंदाज सध्या चांगल्या लयीत आहेत आणि कोण सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे,” असे गिल म्हणाला.

खेळपट्टी अपेक्षेपेक्षा अधिक सपाट : लॅथम

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम यानेही खेळपट्टी अपेक्षेपेक्षा अधिक सपाट असल्याचे मान्य केले. “गेल्या काही वर्षांत या मैदानावर ज्या प्रकारची खेळपट्टी पाहायला मिळाली, त्यापेक्षा ही वेगळी होती. निकोल्स, मिचेल आणि फिलिप्स यांनी परिस्थितीशी जुळवून घेत खेळी केली. मात्र, भारताच्या फलंदाजीवेळी गोलंदाजी करणे आमच्यासाठीही कठीण होते,” असे लॅथम म्हणाला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)