IND Vs NZ 1st Test : सलामीवीरांची सुरेख सुरुवात; यशस्वी, राहुल यांच्या अर्धशतकांमुळे दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद १५९

मुंबईकर यशस्वी जैस्वाल (८९ चेंडूंत ८५ धावा) आणि अनुभवी के. एल. राहुल (११६ चेंडूंत नाबाद ५२ धावा) या सलामीवीरांनी शुक्रवारी दमदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले.
IND Vs NZ 1st Test : सलामीवीरांची सुरेख सुरुवात; यशस्वी, राहुल यांच्या अर्धशतकांमुळे दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद १५९
IND Vs NZ 1st Test : सलामीवीरांची सुरेख सुरुवात; यशस्वी, राहुल यांच्या अर्धशतकांमुळे दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद १५९
Published on: 

वेलिंग्टन : मुंबईकर यशस्वी जैस्वाल (८९ चेंडूंत ८५ धावा) आणि अनुभवी के. एल. राहुल (११६ चेंडूंत नाबाद ५२ धावा) या सलामीवीरांनी शुक्रवारी दमदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने ३९ षटकांत १ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात भारतीय संघ अद्याप २०९ धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वीला शतकाने हुलकावणी दिली, मात्र राहुल ५२ धावांसह नाबाद असून त्याच्या जोडीला देवदत्त पडिक्कल (३५ चेंडूंत नाबाद १६ धावा) खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्यामुळे शनिवारी तिसऱ्या दिवशी भारताचे फलंदाज न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३६८ धावांचा टप्पा गाठून आघाडी घेतील, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर येथे भारताच्या न्यूझीलंडवारीला प्रारंभ झाला होता. २२ ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून आता दिवाळी पार पडल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या झोपेचे गणित बिघडणार आहे. न्यूझीलंडमधील कसोटी सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ३.३०च्या सुमारास सुरू होतात. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून या कसोटीत गोलंदाजी स्वीकारली. जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यासमोर किवी म्हणजेच न्यूझीलंडची एकवेळ ५ बाद ७० अशी स्थिती होती. मात्र गुरुवारी पहिल्या दिवसअखेर न्यूझीलडंने ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली होती. हेन्री निकोल्सच्या शतकासह ग्लेन फिलिप्सच्या अर्धशतकाला याचे श्रेय जाते. तेथून पुढे दुसऱ्या दिवशी निकोल्स व फिलिप्स यांनी शानदार खेळ केला.

निकोल्स-फिलिप्स डोकेदुखी

या दोघांनी दिवसातील सुरुवातीची १० षटके भारताला यश मिळू न देता न्यूझीलंडला ३०० धावांच्या जवळ नेले. फिलिप्सने १४ चौकारांसह दुसरे कसोटी शतक साकारले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल २१६ धावांची भागीदारी रचली. अखेर ९४व्या षटकात आकाश दीपने फिलिप्सचा अफलातून आऊटस्विंगवर त्रिफळा उडवून ही भागीदारी संपुष्टात आणली. फिलिप्सने २१६ चेंडूंत ११८ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने निकोल्सने दीडशतकाची वेस ओलांडली. नॅथन स्मिथ (१४), कायले जेमिसन (११) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र प्रसिध कृष्णाने स्मिथ, तर आकाशने जेमिसनला बाद केले. बुमराने मॅट हेन्रीला (१) पायचीत पकडले. अंशुल कंबोजने जेकब डफीला बाद करून न्यूझीलंडचा डाव १२१ षटकांत ३६८ धावांत संपुष्टात आणला. निकोल्स मात्र २१ चौकारांसह ३३५ चेंडूंत १७५ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून बुमराने ४, तर आकाशने ३ बळी मिळवले.

यशस्वीचे आक्रमण

त्यानंतर भारतीय सलामीवीर यशस्वी व राहुल यांनी आश्वासक सुरुवात केली. दोघांना नशिबाचीही साथ लाभली. डावखुरा २४ वर्षीय फलंदाज यशस्वीने विशेषत: आक्रमक फलंदाजी करताना किवी गोलंदाजांना हैराण केले. दुसऱ्या सत्रात दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. १९९४ मध्ये हॅमिल्टन येथे नवज्योतसिंग सिद्धू आणि नयन मोंगिया यांनी केलेल्या १०२ धावांच्या भागीदारीनंतर भारताची ही पहिलीच शतकी सलामी ठरली.

यशस्वीने आपल्या खेळीत १६ चौकार मारतानाच १४वे अर्धशतक साकारले. त्याने डफीला मारलेला सरळ फटका विशेष आकर्षण ठरला. हेन्रीच्या गोलंदाजीवर त्याने अप्रतिम कव्हर ड्राइव्ह आणि ऑफ ड्राइव्ह खेळले. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या यशस्वीला हेन्रीने बाद केले. टॉम लॅथमने यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलला स्टम्पजवळ बोलावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा न्यूझीलंडला झाला. हेन्रीच्या चेंडूवर यशस्वीच्या बॅटची कड लागली आणि ब्लंडेलने झेल टिपला.

दुसऱ्या बाजूने राहुलने कसोटीतील २२वे अर्धशतक साकारले. त्याने ५ चौकार लगावले आहेत. पडिक्कलने ३ चौकारांसह नाबाद १६ धावा केल्या असून दुसऱ्या विकेटसाठी राहुलसह २९ धावांची भर घातली आहे.

राहुल हा सेना कंट्रीज म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया अशा चारही देशांत कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावणारा भारताचा पहिलाच सलामीवीर ठरला.

यशस्वी-राहुल यांची जोडी ही न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्येच कसोटीत शतकी सलामी नोंदवणारी गेल्या ३० वर्षांतील पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी १९९४मध्ये नवज्योतसिंग सिद्धू व नयन मोंगिया यांनी अशी कामगिरी केली होती.

गंभीर सरांचा नेहमी पाठिंबा - आकाश

पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या आकाशदीपला पुनरागमनाच्या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा मोठा आधार मिळाला. बंगालच्या या वेगवान गोलंदाजाने गंभीर सर पुनर्वसनादरम्यान नियमितपणे आपल्या प्रकृतीची विचारपूस करायचे, असे सांगत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ऑगस्ट २०२५ नंतर आकाश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड (पहिला डाव) : १२१ षटकांत सर्व बाद ३६८ (हेन्री निकोल्स नाबाद १७५, ग्लेन फिलिप्स ११८; जसप्रीत बुमरा ४/९२)

भारत (पहिला डाव) : ३९ षटकांत १ बाद १५९ (यशस्वी जैस्वाल ८५, के. एल. राहुल नाबाद ५२; मॅट हेन्री १/४३)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)