सॅमसन, नमनमुळे विजयारंभ; भारताकडून विक्रमी धावसंख्येचा पाठलाग, न्यूझीलंडवर ४ गडी राखून सरशी

सलामीवीर संजू सॅमसनने (३३ चेंडूंत ६७ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला प्रतिभावान नमन धीरच्या (१५ चेंडूंत नाबाद ४२ धावा) फटकेबाजीची सुरेख साथ लाभली.
सॅमसन, नमनमुळे विजयारंभ; भारताकडून विक्रमी धावसंख्येचा पाठलाग, न्यूझीलंडवर ४ गडी राखून सरशी
सॅमसन, नमनमुळे विजयारंभ; भारताकडून विक्रमी धावसंख्येचा पाठलाग, न्यूझीलंडवर ४ गडी राखून सरशी(Photo-X)
Published on: 

ख्राईस्टचर्च : सलामीवीर संजू सॅमसनने (३३ चेंडूंत ६७ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला प्रतिभावान नमन धीरच्या (१५ चेंडूंत नाबाद ४२ धावा) फटकेबाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडवर ४ गडी व २ चेंडू राखून मात केली. न्यूझीलंडचे २२६ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. टी-२० क्रिकेटमध्ये भारताने प्रथमच इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला.

हॅगली ओव्हल येथील मैदानात झालेल्या या लढतीत भारताच्या सर्वच गोलंदाजांचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी साकारून किवी संघाला २० षटकांत ४ बाग २२५ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. मात्र सॅमसन, नमन यांच्यासह कर्णधार श्रेयस अय्यर (२८ चेंडूंत ४२), अक्षर पटेल (१४ चेंडूंत २४) व अभिषेक शर्मा (१२ चेंडूंत २९) यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने विजय मिळवला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना नमनने पहिल्या चेंडूवर चौकार व चौथ्या चेंडूवर षटकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने यापूर्वी २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांचे शिखर सर केले होते. सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना शनिवारी खेळवण्यात येईल.

दरम्यान, एकीकडे भारतात नवरात्रोत्सव संपलेला असतानाच भारतीय संघाच्या न्यूझीलंड वारीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वात खेळताना यंदादेखील भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. या दौऱ्यात न्यूझीलंडमधील खेळपट्टी, वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान भारतापुढे असेल. भारताला या मालिकेपूर्वी फारशी विश्रांती मिळालेली नाही. १७ ऑक्टोबर रोजी भारतात विंडीजविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळल्यानंतर २ दिवसांपूर्वीच भारतीय संघ न्यूझीलंडला दाखल झाला. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना फिन ॲलनच्या २४ चेंडूंतील ४५ धावांमुळे न्यूझीलंडने धडाकेबाज सुरुवात केली. मयांक यादवने टिम सेईफर्ट (२४), तर अर्शदीप सिंगने डॅरेल मिचेलचा (२८) अडसर दूर केला. भारताने या डावात दोन झेलही सोडले. अक्षरने फिनला जाळ्यात अडकवले. मात्र बेव्हन जेकब्स (१६ चेंडूंत ३१) व फिलिप्स यांनी चौथ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी रचली. न्यूझीलंडने शेवटच्या पाच षटकांत ६७ धावा कुटल्या. भारताच्या पाचही गोलंदाजांनी षटकामागे १०च्या सरासरीने धावा लुटल्या. पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला चार षटकांत ४९ धावा देऊनही एकही विकेट मिळवता आली नाही.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना सॅमसन व अभिषेक यांनी पॉवरप्लेमध्येच भारताला ९३ धावांपर्यंत स्फोटक मजल मारून दिली. सॅमसनने ८ चौकार व ४ षटकारांसह ११वे अर्धशतक साकारले. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी मधल्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या सात धावांत तीन गडी बाद केले. त्यामुळे नवव्या षटकापर्यंत ९३ धावांवर कोणतीही बाद नसलेला भारतीय संघ ११व्या षटकापर्यंत चार गडी बाद १२२ अशा अडचणीत सापडला. इशान किशन आणि तिलक वर्मा यांना मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात बाद व्हावे लागले.

सॅमसन बाद झाल्यानंतर अय्यरने डाव सावरला. १५व्या षटकात फिनने झेल सोडल्याने अय्यरला जीवनदान मिळाले. श्रेयस व अक्षर यांनी पाचव्या विकेटसाठी ४५ धावांची भर घातली. अक्षर बाद झाल्यावर अखेरच्या ३० चेंडूंमध्ये ५५ धावांची गरज असताना नमनने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत ५ चौकार व २ षटकारांसह संघाचा विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : २० षटकांत ४ बाद २२५ (ग्लेन फिलिप्स नाबाद ८२, फिन ॲलन ४५; मयांक यादव १/४०) पराभूत वि.

भारत : १९.४ षटकांत ६ बाद २३० (संजू सॅमसन ६७, नमन धीर नाबाद ४२, श्रेयस अय्यर ४२; मायकेल ब्रेसवेल २/३७)

सामनावीर : संजू सॅमसन

  • सॅमसनने यंदाच्या वर्षात २६ डावांत आठव्यांदा ५० हून अधिक धावांची खेळी केली. किवींविरुद्ध त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. मार्च महिन्यात विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही त्याने अर्धशतक केले होते.

  • भारताने टी-२० प्रकारात प्रथमच २२६ धावांचा यशस्वी पाठलाग केला. २०२३मध्ये भारताने २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाठले होते.

पॉवरप्लेमध्ये खेळ संपवणे अनिवार्य - सॅमसन

“मला नाही वाटत की आम्ही आमची खेळण्याची पद्धत फारशी वेगळी ठेवली असती. मात्र, खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दृष्टिकोनही वेगवेगळा असतो,” असे सॅमसनने सांगितले. जेव्हा त्याला विचारले गेले की, जर भारतासमोर विजयासाठी कमी धावांचे लक्ष्य असते, तर फलंदाजी करताना त्यांचा दृष्टिकोन वेगळा असता का, तेव्हा त्याने हे उत्तर दिले. “जेव्हा तुम्हाला पॉवरप्लेमध्ये खूप चांगली सुरुवात मिळते. तेव्हा आम्ही खेळाचे टप्पे अशा प्रकारे विभागतो : पॉवरप्ले, मधली षटके (मिडल-ओव्हर्स) आणि शेवटची षटके (डेथ ओव्हर्स) - हे सर्व टप्पे एकमेकांपासून वेगळे असतात,” असे सॅमसन म्हणाला. “त्यामुळे, समजा तुम्ही १७० धावांचा पाठलाग करत असाल आणि तुम्हाला दमदार सुरुवात मिळाली, तर आम्ही प्रयत्न करतो की पॉवरप्लेमध्येच सामन्यावर आपली पकड मजबूत करावी. गेल्या काही वर्षांत आम्ही हे अतिशय प्रभावीपणे केले आहे,” असे सॅमसनने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in