आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारताची आज ओमानशी गाठ

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताची शुक्रवारी रंगणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात ओमानशी गाठ पडणार आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारताची आज ओमानशी गाठ
Published on

दुबई : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताची शुक्रवारी रंगणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात ओमानशी गाठ पडणार आहे. भारताने आधीच अ-गटातून अग्रस्थानासह सुपर-फोर फेरी गाठली आहे, तर ओमानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या लढतीत भारतीय संघ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगत आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने पहिल्या लढतीत यूएईचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. या दोन्ही लढतींमध्ये चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा कुलदीपच्या कामगिरीकडे लक्ष असेल. जसप्रीत बुमराला या लढतीसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

फलंदाजीत भारताची अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शुभमन गिल यांच्यावर भिस्त आहे. तसेच सूर्यकुमारही उत्तम लयीत आहे. संजू सॅमसन, हार्दिक पंड्या व अक्षर पटेल यांना अद्याप फलंदाजीची फारशी संधी लाभलेली नाही. त्यामुळे त्यांना फलंदाजीत वरच्या स्थानी बढती मिळू शकते. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, पाकिस्तानने अ-गटातून आगेकूच केली आहे. त्यांनी बुधवारी रात्री यूएईवर मात केली. त्यामुळे त्यांचे ३ सामन्यांत ४ गुण झाले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात २१ तारखेला पुन्हा एकदा सामना होणार आहे. त्यामुळे यावेळी उभय संघांतील खेळाडू हस्तांदोलन करणार की पूर्वीप्रमाणेच भारताचे खेळाडू फक्त खेळावर लक्ष देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

  • वेळ : रात्री ८ वा.

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

logo
marathi.freepressjournal.in