Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

आशिया चषकात भारत आतापर्यंत अपराजित राहिला असून रविवारी अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढणार आहे. दोन्ही गट सामन्यांत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर जेतेपदाच्या लढतीतही वर्चस्व राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत
Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत
Published on

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहत भारताने दिमाखात आगेकूच केली आहे. रविवारी अंतिम फेरीत भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. स्पर्धेतील दोन्ही लढतीत पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजल्यानंतर आता जेतेपदाच्या लढतीतही आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी करण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याने जगातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीची नेहमीच उत्कंठा असते. या सामन्याला राजकीय रंग चढल्याने वातावरण अधिकच तापलेले आहे.

भारताकडून अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी शानदार कामगिरी केली आहे. अभिषेकने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या आहेत. कुलदीप यादवने १३ फलंदाजांना माघारी धाडले आहे.

भारताने स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी आणि सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवणे टाळले. दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने मैदानात आक्षेपार्ह इशारे केले. त्यामुळे आयसीसीने दोन्ही संघांना ३० टक्के दंड ठोठावला.

पाकीस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी एक्सवर वादग्रस्त पोस्ट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. मात्र हा सामनाही भारताने खिशात घातला.

पाकिस्तानने कसाबसा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीनंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसोन म्हणाले की, अंतिम सामना हाच खरा सामना असतो.

अंतिम सामन्यात भारतासमोर दुखापतीचे आव्हान आहे. श्रीलंकेविरुद्ध हार्दीक पंड्याला दुखापत झाली. अभिषेक शर्मा दुबईतील उष्णतेमुळे त्रस्त आहे. पण अभिषेक ठिकठाक आहे, असे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी शुक्रवारी रात्री सांगितले. त्यामुळे भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे.

अभिषेक शर्मा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांत ३०९ धावा केल्या आहेत. त्यानंतर तिलक वर्माने १४४ धावा जमवल्या आहेत.

पाकिस्तानच्या विजयाच्या आशा त्यांच्या नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांवर अवलंबून आहेत. शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्याकडून प्रभावी गोलंदाजीची अपेक्षा संघाला आहे.

अभिषेक अपयशी ठरला तर?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम आक्रम म्हणतो की, पाकिस्तानला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना अभिषेकला लवकर बाद करावे लागेल. त्यामुळे अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यास भारताकडे पर्याय काय? याचा विचार भारताला करावा लागेल. सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. शुभमन गिलने स्पर्धेत आपल्या खेळीची चांगली सुरुवात केली, पण त्याला त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आलेले नाही. संजू सॅमसन, तिलक वर्मा यांनी बरी कामगिरी केली आहे. पण त्यांना या सामन्यात जबाबदारीने खेळावे लागेल.

पाकिस्तानच्या फलंदाजांची पुन्हा परीक्षा

स्पर्धेत पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजांनी अगदीच निराश केले आहे. साहिबझादा फरहान सोडल्यास त्यांचे अन्य फलंदाज धावांसाठी झटताना दिसत आहेत. सय्यम अयुबला चार सामन्यांत भोपळाही फोडता आलेला नाही. हुसैन तलत आणि सलमान अली अघा भारतीय फिरकीपटूंविरुद्ध अपयशी ठरले आहेत. रविवारी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांची पुन्हा एकदा परीक्षा आहे.

दबावाखाली चांगली फलंदाजी करायला हवी - मॉर्केल

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात रविवारी भारतीय फलंदाजांनी दबावाखाली चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी व्यक्त केली. भारताने प्रथम फलंदाजी केली तर मोठ्या भागीदारी होणे आवश्यक आहे. कारण नवीन फलंदाजाला सुरुवातीला फलंदाजी करणे कठीण असते. पण तरीही भारताने आक्रमक दृष्टिकोन ठेवायला हवा, असे मॉर्केल म्हणाले. भारतीय खेळाडू दर्जेदार आहेत. पण दबावाच्या सामन्यात त्यांना खेळ उंचवावा लागेल, असे मॉर्केल म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in