दुबई : अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. दुबईच्या रणांगणात झालेल्या अ-गटातील या लढतीत भारताने पाकिस्तानचा ७ गडी व २५ चेंडू राखून पराभव केला. चायनामन कुलदीप यादव (१८ धावांत ३ बळी) आणि डावखुरा अक्षर पटेल (१८ धावांत २ बळी) या फिरकीपटूंनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
पाकिस्तानला २० षटकांत ९ बाद १२७ धावांत रोखल्यावर भारताने १५.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. सूर्यकुमारने ३७ चेंडूंत सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. त्यानेच विजयी षटकार लगावला. तिलक वर्मा (३१ चेंडूंत ३१) व अभिषेक शर्मा (१३ चेंडूंत ३१) यांनीही उत्तम योगदान दिले. याबरोबरच भारताने सलग दुसरा विजय नोंदवताना ४ गुणांसह अग्रस्थान काबिज केले. आता शुक्रवारी भारताची ओमानशी गाठ पडेल. मात्र भारताचे सुपर-फोर फेरीतील स्थान पक्के झाले आहे.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यांची संख्या रोडावली आहे. त्यातच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी खेळू नये, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र केंद्र शासनाच्या सल्ल्यानुसार आयसीसी व बहुदेशीय स्पर्धांमध्ये भारताला पाकिस्तानशी खेळणे बंधनकारक असेल. त्यामुळेच हा सामना खेळवण्यात आला.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर सय्यम अयूबला शून्यावर माघारी पाठवले. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराने मोहम्मद हॅरिसला (३) बाद केले. २ बाद ६ धावा या धक्क्यातून पाकिस्तान सावरू शकला नाही. साहिबझादा फरहान (४०) व फखर झमान (१७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी जेमतेम ३९ धावांची भर घातली.
मात्र फिरकीपटूंचे गोलंदाजीस आगमन झाल्यावर पाकिस्तानचा डाव घसरला. अक्षरने झमान व सलमान (३) यांचे बळी मिळवले. तर कुलदीपने फरहान, हसन नवाझ (५) व मोहम्मद नवाझ (०) यांना तंबूत पाठवले. एकवेळ त्यांचा संघ १३ षटकांत ६ बाद ६४ अशा स्थितीत होता. अखेरीस शाहीन आफ्रिदीने १६ चेंडूंत नाबाद ३३ धावा फटकावल्या. त्यामुळे पाकिस्तानने २० षटकांत ९ बाद १२७ धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेकने पुन्हा एकदा धडाक्यात सुरुवात केली. मग सूर्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.
मैदानातही टश्शन; सूर्यकुमारने हस्तांदोलन टाळले
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी देशभरातून जोर धरत असतानाच, प्रत्यक्ष नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा याच्याशी हस्तांदोलन करणे टाळले. खेळभावनेनुसार, नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा देतात. पण सूर्यकुमार यादवने हात मिळवणे टाळलेच आणि सलमानकडे लक्षही दिले नाही.