

दुबई : एकीकडे महाराष्ट्रात शनिवारी दहीहंडीचा थरथराट पाहायला मिळणार असतानाच दुबईत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरारही अनुभवता येणार आहे. महिलांच्या आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाची पाकिस्तानशी गाठ पडेल. भारताने सलग दोन विजयांसह आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले असून ते आता हॅटट्रिक साकारण्यासाठी उत्सुक असतील.
आशियाई पातळीवर भारतीय संघाच्या दर्जाच्या आसपासही कोणताही संघ नाही. दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात थायलंडचा पराभव केला असून ते अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहेत. या सामन्यापूर्वी भारताच्या स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोन्ही सलामीवीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. गुरुवारी हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात स्मृतीने शानदार शतक झळकावत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. दुबईतील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे सोपे राहिलेले नाही. फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी साधारण १० चेंडू लागतात आणि त्यानंतरच त्या आपल्या डावाचे नियोजन करतात. स्मृती आणि शफाली यांनी गुरुवारी हीच रणनीती आखली होती. प्रतिका रावल, रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत यांना मधल्या षटकांत अधिक वेळ घालवण्याची गरज आहे. तीन क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या प्रतिकावर टी-२० प्रकाराच्या आवश्यकतेनुसार धावा करण्याचे आव्हान आहे. वेगवान गोलंदाजीत क्रांती गौडसोबत गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या नंदिनी शर्माने प्रभावी कामगिरी केली आहे.
पाकिस्तानला भारताला आव्हान देण्यासाठी आपल्या फलंदाजीत मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. फलंदाजीतील कमकुवतपणा हा त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय राहिला आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावले होते, तरीही ११९ धावांच्या छोट्या आव्हानाचा बचाव करण्यात त्यांना यश आले. हा संघ सलामीवीर मुनिबा अली आणि अष्टपैलू कर्णधार फातिमा सना यांच्यावर अतिप्रमाणात अवलंबून आहे.
एकूणच आता महिला क्रिकेट भरारी घेत आहे. मात्र भारताला टी-२० प्रकारात कामगिरी उंचावण्याची गरज आहे. इंग्लंड येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. २०२०च्या विश्वचषकात भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. हीच भारतीय महिलांची टी-२० विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, भारती फुलमाळी, क्रांती गौड, रिचा घोष, गुणालन कमलिनी, प्रतिका रावल, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, नंदिनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ वाहिनी आणि सोनी लाइव्ह ॲप
स्मृतीचे लक्षवेधी विक्रम
भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने गुरुवारी हाँगकाँगविरुद्ध ६४ चेंडूंत १२४ धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान तिने विविध विक्रम मोडीत काढले, तर काही नवे विक्रमही रचले. त्यामुळे भारताने १३७ धावांनी धडाकेबाज विजय मिळवला. भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला, हे विशेष.
स्मृतीने मिताली राजचा विक्रम मोडीत काढत आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. मितालीच्या नावे १०,८६८ धावा होत्या, तर स्मृतीच्या आता १०,८८० धावा झाल्या आहेत.
स्मृतीने आशिया चषक स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. श्रीलंकेच्या चमारी अटापटूने २०२४मध्ये मलेशियाविरुद्ध नोंदवलेली नाबाद ११९ धावांची खेळी स्मृतीने मागे टाकली. स्मृतीने १२४ धावा फटकावल्या.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८ शतके ठोकणारी फलंदाज बनण्याचा मानही स्मृतीने पटकावला आहे. तिने ऑस्ट्रेलियाची महान खेळाडू मेग लॅनिंग हिचा १७ शतकांचा विक्रम मोडीत काढला.