भारतीय पुरुष हॉकी संघापुढे पाकिस्तानचे पुन्हा लोटांगण; ५-३ अशा विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश, अभिषेकची चमक

कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि आक्रमणपटू अभिषेक यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने पुरुषांच्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला.
भारतीय पुरुष हॉकी संघापुढे पाकिस्तानचे पुन्हा लोटांगण; ५-३ अशा विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश, अभिषेकची चमक
भारतीय पुरुष हॉकी संघापुढे पाकिस्तानचे पुन्हा लोटांगण; ५-३ अशा विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश, अभिषेकची चमकX
Published on

ॲम्स्टेलवीन : कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि आक्रमणपटू अभिषेक यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने पुरुषांच्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला. ड-गटातील या सामन्यातील विजयामुळे भारताने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला असून पाकिस्तानविरुद्धचा गेल्या दशकभराचा अजिंक्य राहण्याचा पराक्रम कायम ठेवला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे पुरुष आणि महिलांच्या हॉकी विश्वचषकाला प्रारंभ झाला. तब्बल ५१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय संघ यंदा विश्वचषकात सहभागी झाला आहे. भारताने एकमेव विश्वचषक १९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वालालंपूर येथे पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता. त्यापूर्वी भारताने १९७१मध्ये कांस्य आणि १९७३मध्ये रौप्यपदक पटकावले होते. यंदाच्या विश्वचषकात भारताने पहिल्या साखळी सामन्यात वेल्सला ३-१ अशी धूळ चारली. मात्र त्यानंतर इंग्लंडकडून भारताला २-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध भारताला विजय आवश्यक होता.

बुधवारच्या लढतीत भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने ५व्या आणि २१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर अभिषेकने ११व्या आणि २४व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवले. हार्दिक सिंगने ३४व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. पाकिस्तान संघाकडून हन्नान शाहिदने २२व्या आणि ४६व्या मिनिटाला दोन गोल केले, तर सुफियान खानने २४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या निकालामुळे ड-गटातून भारत आणि इंग्लंड दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. इंग्लंडने तिन्ही सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले. आठ वर्षांनंतर पहिला विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तानने तीन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण १० हजार प्रेक्षकांनी भरलेल्या वागेनर स्टेडियमवर भारताने संयम राखत विजय मिळवला.

दोन्ही संघांमध्ये १६ वर्षांनंतर झालेली ही पहिलीच विश्वचषक लढत होती. यापूर्वी २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४-१ असा पराभव केला होता. तेव्हापासून भारताचे वर्चस्व अबाधित आहे.

दुसऱ्या फेरीत काय होणार?

हॉकी विश्वचषकात १६ संघ सहभागी झाले होते. त्यांची एका गटात चार याप्रमाणे चार गटांत विभागणी करण्यात आली होती. आता प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्यांपैकी अ आणि ड गटातील प्रत्येकी दोन संघांचा एक गट, तर ब आणि क गटातील चार संघांचा एक गट तयार करण्यात येईल.

भारत, इंग्लंड यांनी ड-गटातून आगेकूच केली असून त्यांच्या गटात उर्वरित दोन संघ अ-गटातून येतील. नेदरलँड्स आणि अर्जेंटिना असे संघ भारतीय गटात येऊ शकतात. २२ आणि २४ तारखेला भारताचे सामने होऊ शकतात.

दुसऱ्या फेरीत भारताला इंग्लंडशी पुन्हा खेळावे लागणार नाही. कारण साखळीतीलच गुण यासाठी ग्राह्य धरले जातील. पहिल्या फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्यामुळे भारत पुढील फेरीत शून्य गुणांसह प्रवेश करेल. भारताला उर्वरित दोन लढतींमध्ये विजय अनिवार्य असेल. दुसऱ्या फेरीतून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

आजचा सामना

  • भारत वि. इंग्लंड (महिला)

  • वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, जिओहॉटस्टार ॲप

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in