भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा

India vs Pakistan U19 Final: आशिया चषकाच्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय युवा संघ शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा
भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चाX
Published on: 

अल अमेरात (ओमान) : आशिया चषकाच्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा मिळवण्यासाठी भारतीय युवा संघ शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत अधिक सामूहिक कामगिरी करावी लागणार आहे. आर्यवीर सेहवाग आणि इशान सूद या दोन प्रमुख खेळाडूंना अन्य सहकाऱ्यांची साथ मिळणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

गतवर्षी पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारताचा १५१ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा त्या पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी आहे. भारताने आतापर्यंत आठ वेळा ही स्पर्धा जिंकली असून विक्रमी नवव्या विजेतेपदावर संघाचे लक्ष आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. चार सामन्यांत त्याने १०१च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अग्रस्थानी आहे. गोलंदाजीत इशान सूदने प्रतिस्पर्धी संघांना अडचणीत आणले आहे. चार सामन्यांत त्याने ११ बळी मिळवले आहेत.

मात्र, या दोघांव्यतिरिक्त भारतीय फलंदाजांकडून सातत्यपूर्ण योगदान मिळालेले नाही. कर्णधार लक्ष्य रायचंदानी, यष्टिरक्षक फलंदाज अन्वय द्रविड, अर्जुन राजपूत आणि व्ही. के. विनीत यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

राजपूतने पाकिस्तानविरुद्ध साखळी सामन्यात आक्रमक शतक झळकावले होते. मात्र, त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध लक्ष्यने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर विनीतनेही अर्धशतक झळकावले. अंतिम सामन्यात या फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.

पाकिस्तानकडून उस्मान खानने चार सामन्यांत २३८ धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज रिझवानुल्लाहने ११ बळी मिळवले आहेत.

गोलंदाजीत भारताकडून इशान सूदने मोठी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, फिरकीपटू अर्जुन राजपूत आणि मनल चौहान यांच्याकडून अधिक प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड, रजत बघेल, व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहित उल्वा, काव्या पटेल, शाविन विनोद, इशान सूद.

पाकिस्तान : फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, उस्मान खान, हयाम खान, हसनैन अब्बास दार, जहांगीर बिलाल, अहमद हुसेन, निकाब शफीक, हमजा जहूर, अब्दुल सुब्हान, अली रझा, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सय्यम, रिझवानुल्लाह, अब्दुल कादिर.

वेळ : सकाळी १०.३० वाजता; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप