

अल अमिरात (ओमान) : १९ वर्षांखालील आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताच जणू दिवाळे निघाले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतावर ३ गडी व ११ चेंडू राखून विजय मिळवला. हमजा जहूरने (१०८ चेंडूंत नाबाद १०० धावा) शतकी खेळी करत भारताच्या अर्जुन राजपूतच्या आक्रमक १०७ धावांच्या खेळीवर पाणी फेरले.
रविवारी झालेल्या अ-गटातील या सामन्यात पाकिस्तानने भारताचे २०९ धावांचे लक्ष्य दोन षटके शिल्लक असताना पूर्ण केले. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हमजा जहूरने हसनैन डारसोबत १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दारने ३८ धावांचे योगदान दिले. पाकिस्तान एकवेळ ५ बाद ६१ अशा संकटात होता. मात्र तरीही त्यांनी विजय मिळवून दाखवला. सामन्यानंतर जहूर म्हणाला, “मला शेवटपर्यंत खेळायचे होते. माझ्या देशाला विजय मिळवून देऊ शकतो, याची मला खात्री होती.”
भारताची गोलंदाजी निष्प्रभ
पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली होती. भारताचा डावखुरा फिरकीपटू मनाल चौहानने १३व्या आणि १५व्या षटकात सलग धक्के देत पाकिस्तानला अडचणीत आणले. त्याने ३२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. मात्र, जहूर आणि डार यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला.
जहूरने वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फटके खेळले, तर फिरकीपटूंविरुद्धही प्रभावी फलंदाजी केली. ईशान सूदच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने लगावलेला त्याचा षटकार विशेष आकर्षक ठरला. धावफलकावर १६८ धावा असताना डार बाद झाल्यानंतर पाकिस्तानला विजयासाठी आणखी ४१ धावांची गरज होती. मात्र, जहूरने अखेरपर्यंत नाबाद राहात काव्य पटेलच्या गोलंदाजीवर चौकार मारून शतक आणि पाकिस्तानचा विजय साकारला.
भारताची सुरुवातीलाच फलंदाजी कोलमडली
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या ४२ धावांत भारताने चार प्रमुख फलंदाज गमावले. कर्णधार लक्ष्य रायचंदानी, आर्यवीर सेहवाग (२२), व्ही. के. विनीत आणि यशवर्धन चौहान लवकर बाद झाले. त्यानंतर अर्जुन राजपूतने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. त्याने यष्टीरक्षक अन्वय द्रविड (१०) याच्यासोबत ४४ धावांची, तर चौहानसोबत ६४ धावांची भागीदारी केली.
राजपूतने १०७ धावांची शानदार खेळी केली. मात्र, तो ३६व्या षटकात बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. काव्य पटेलने २३ धावा करत अखेरच्या टप्प्यात योगदान दिले. भारताचा संपूर्ण संघ ४६.३ षटकांत २०८ धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून अली रझा (३/३७), रिझवानुल्लाह (३/२४) आणि निकाब शफीक (३/४२) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
एकंदर पाकिस्तानने भारतावर वर्चस्व गाजवून स्पर्धेत उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
गुणतालिकेचे स्वरूप काय?
या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांत चार गुण मिळवत अ-गटात अव्वल स्थान पटकावले आहे. भारत दोन सामन्यांतील दोन गुणांसह (१ विजय, १ पराभव) दुसऱ्या स्थानावर आहे. भारतासाठी हा पराभव स्पर्धेतील पुढील वाटचालीच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या लढतीत भारताने नेपाळला धूळ चारली होती. आता मंगळवारी भारताची अमिरातीशी गाठ पडेल. अमिरातीने नेपाळला नमवले आहे. त्यामुळे भारत-अमिराती यांच्यातील विजेता गटातील दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठू शकतो.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४६.३ षटकांत सर्व बाद २०८ (अर्जुन राजपूत १०७, काव्य पटेल २३; अली रझा ३/३७) पराभूत वि.
पाकिस्तान : ४८.१ षटकांत ७ बाद २०९ (हमजा जहूर नाबाद १००, हस्नैन डार ३८; मनल चौहान ३/३२)