

गुवाहाटी : भारताचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. स्वत: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. त्यामुळे गिलच्या अनुपस्थितीत डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारताचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शनिवार, २२ तारखेपासून गुवाहाटी येथे दुसरी कसोटी रंगणार आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने २६ वर्षीय गिलला दुखापत झाली. पहिल्या डावात अवघ्या ४ धावा केल्यावर गिल रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. तो दुसऱ्या डावातही फलंदाजीस आला नाही. गिल सध्या गुवाहाटीला दाखल झाला असला, तरी बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने त्याला जोखीम न पत्करण्याचे आदेश दिले आहेत, असे समजते.
“गिलच्या प्रकृतीत नक्कीच सुधारणा होत आहे. मात्र शुक्रवारी त्याची अंतिम चाचणी घेण्यात येईल. संघाचे फिजिओ व वैद्यकीय फळी गिलच्या तंदुरुस्तीविषयी अंतिम निर्णय घेईल. कारण १ टक्काही त्याच्या तंदुरुस्तीविषयी शंका असली व गिल संघात असला, तर यामुळे त्याचे व संघाचेही नुकसान होईल,” असे कोटक म्हणाले.
“गिलच्या अनुपस्थितीत एका युवा खेळाडूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आमच्यासमोर सुदर्शन किंवा जुरेलपैकी एकाला खेळवण्यासह नितीश रेड्डीलाही संघात स्थान देण्याचा पर्याय आहे. गिल नसल्यास पंत कर्णधारपद बजावण्यासाठी सज्ज आहे,” असेही कोटक यांनी नमूद केले. त्यामुळे २८ वर्षीय पंत भारताचा ३८वा कसोटी कर्णधार बनू शकतो.
दरम्यान, गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण दक्षिण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष. आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता.
या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांच्यापुढे दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान आहे.
गंभीरला दोषी ठरवणे चुकीचे!
भारताची कसोटीत गेल्या वर्षभरात सुमार कामगिरी सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात ०-३ असा मालिका पराभव पत्करल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका गमावली. त्यानंतर आता आफ्रिकेविरुद्धही भारतीय संघ पिछाडीवर आहे. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली असून संघनिवड व त्याचे निर्णय चुकत असल्याचे म्हटले आहे. कोटक यांनी मात्र गंभीरची पाठराखण केली आहे.
“गंभीरला पराभवासाठी दोषी ठरवणे किंवा त्याच्यावर खापर फोडणे चुकीचे आहे. काही जणांना त्याच्यावर विनाकारण निशाणा साधायचा असतो. मात्र ते पूर्ण चुकीचे आहे. फलंदाजांनी दुसऱ्या डावात जबाबदारीने खेळ करणे अपेक्षित होते,” असे कोटक म्हणाले.