IND vs SL 1st ODI : रोहित-गंभीर पर्वाचा नव्या अध्याय आजपासून; राहुल की पंत, कोणाला मिळणार संधी?

टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता शुक्रवारपासून भारतीय संघाचे शिलेदार श्रीलंकेशी एकदिवसीय मालिकेत दोन हात करतील.
IND vs SL 1st ODI : रोहित-गंभीर पर्वाचा नव्या अध्याय आजपासून; राहुल की पंत, कोणाला मिळणार संधी?
Published on

कोलंबो : टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता शुक्रवारपासून भारतीय संघाचे शिलेदार श्रीलंकेशी एकदिवसीय मालिकेत दोन हात करतील. उभय संघांतील तीन लढतींच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याद्वारे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील मैत्रीचा नव्या अध्यायही सुरू होईल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत टी-२० मालिकेत ३-० अशी धूळ चारली. रोहित, विराट कोहली, रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी-२० विश्वविजयानंतर या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेद्वारे रोहित, विराट पुन्हा क्रिकेटकडे वळतील. गंभीरने स्वत: २०२५मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच २०२७चा एकदिवसीय विश्वचषक विचार करता रोहित-विराट यांनी एकदिवसीय मालिकांसाठी उपलब्ध रहावे, असे मत व्यक्त केले होते. दरम्यान, जसप्रीत बुमरा, जडेजा, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

दुसरीकडे चरिथ असलंका श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार असून या संघात जनिथ लियांगे, निशान मदुष्का यांचे पुनरागमन झाले आहे. नुवान थुशारा व दुष्मंता चमीरा यांना दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकावे लागणार आहे. अशा स्थितीत त्यांच्यापुढील आव्हान वाढणार आहे.

या मालिकेत प्रामुख्याने के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघ कोणाला प्राधान्य देते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पंत संघात परतल्याने सध्या त्याचेच पारडे या जागेसाठी जड मानले जात आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, असिता फर्नांडो.

logo
marathi.freepressjournal.in