

कोलंबो : २५ वर्षीय डावखुरा फलंदाज सोनल दिनुषा गुरुवारी भारतीय संघ आणि विजय यांच्यात भिंत बनून उभा राहिला. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत दिनुषाने (२६४ चेंडूंत नाबाद १३३ धावा) संपूर्ण पाचवा दिवस फलंदाजी करून सामन्यातील सलग दुसरे शतक साकारले. त्यामुळेच श्रीलंकेने भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली. भारताने या मालिकेत १-० असे यश संपादन केले असले, तरी त्यांना दुसरी लढत जिंकू न दिल्याने श्रीलंकेच्या जिगरबाज लढ्याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. कारकीर्दीतील पाचवीच कसोटी खेळणाऱ्या दिनुषाने तब्बल ४२० मिनिटे किल्ला लढवला, हे विशेष.
कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या लढतीत श्रीलंकेने दुसऱ्या डावात तब्बल १५४ षटके फलंदाजी करताना ९ बाद ४२९ धावांपर्यंत मजल मारली. पाचव्या दिवसातील शेवटचा एक तास शिल्लक असताना श्रीलंकेने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्रीलंकेकडे २१६ धावांची आघाडी होती. भारतापुढे उर्वरित १६-१७ षटकांत हे लक्ष्य गाठण्याचे आव्हान होते. मात्र कर्णधार शुभमन गिलसह सर्व खेळाडूंनी आपसी सहमतीने लढत अनिर्णित राखण्यातच धन्यता मानली आणि श्रीलंकन खेळाडूंसह हातमिळवणी केली.
त्यामुळे भारताला मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवता आले नाही. पहिल्या डावात १०३ व दुसऱ्या डावात १३३ अशा एकाच लढतीत २३६ धावा करणाऱ्या दिनुषाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने २ सामन्यांत दोन शतकांसह ३२८ धावा केल्या.
मुख्य म्हणजे पाचव्या दिवशी एकदाही वरुणराजा म्हणजेच पावसाचे आगमन झाले नाही. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या शेवटच्या चार फलंदाजांनी (गोलंदाजांनी) नेटाने किल्ला लढवला. केशरा नुवांथा (१५० चेंडूंत ४६), प्रभात जयसूर्या (२८ चेंडूंत २), लाहिरू कुमारा (९० चेंडूंत १२) व असिथा फर्नांडो (२४ चेंडूंत ०) यांनी दिनुषाला सुरेख साथ देताना भारतीय गोलंदाजांना हैराण केले. त्यामुळेच चौथ्या दिवसअखेर ७२ षटकांत ६ बाद २२९ अशी धावसंख्या असूनही गुरुवारी पाचवा दिवस संपेपर्यंत त्यांनी पुढील ८२ षटकांत फक्त ३ फलंदाज गमावून आणखी २०० धावांची भर घातली. गिलचा नेतृत्वातील अननुभव व भारतीय गोलंदाजांचा ढिसाळपणाही यास कारणीभूत ठरला.
दरम्यान, भारतीय संघ गेली दोन आठवडे श्रीलंका दौऱ्यावर होता. उभय संघांतील पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांच्या फरकाने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना मालिकेत क्लीन स्वीप लगावण्याची संधी होती. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित ७ लढतींमध्ये चमकदार कामगिरी करणे गरजेचे आहे. दुसऱ्या कसोटीनंतर भारताची टक्केवारी ५१.५२ इतकी असून ते सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलिया (८०), दक्षिण आफ्रिका (७५), न्यूझीलंड (७२.२२), बांगलादेश (५५.५६) हे चार संघ भारतापुढे आहेत. भारत २०२१ व २०२३मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारत अद्याप पहिल्या डब्ल्यूटीसी जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. भारताचे आता नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन, तर जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पाच कसोटी सामने होतील.
तत्पूर्वी, पाचव्या दिवशी ६ बाद २२९ धावांवरून पुढे खेळताना श्रीलंकेकडे केवळ १६ धावांची आघाडी होती. परंतु दिनुषाने १९६ चेंडूंत शतक पूर्ण करत नुवांथाच्या साथीने सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. पहिल्या सत्रात भारताला एकही बळी मिळवता आला नाही. दुसऱ्या सत्रात मानव सुथारने नुवांथाला ध्रुव जुरेलकरवी झेलबाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर जयसूर्याने दिनुषाला साथ देत ७४ चेंडूंत २५ धावा जोडल्या. रवींद्र जडेजाने जयसूर्याला बाद केले. त्यानंतर लाहिरूने दिनुषासह आठव्या गड्यासाठी १७० चेंडूंत ४७ धावांची भर घातली. कुमाराला जडेजाने बाद केले, मात्र फर्नांडोने दिनुषाला शेवटपर्यंत साथ दिली व लढत अनिर्णित राखण्यात यश मिळवले. अंतिम दिवशी श्रीलंकेच्या तळाच्या चार फलंदाजांना बाद करण्यात अपयश आल्याची खंत मात्र भारताला नक्कीच राहील.
श्रीलंकेविरुद्ध सलग सहावा मालिका विजय
भारत चार वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत होता. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते. भारताचा हा एकंदर सहावा मालिका विजय ठरला.
भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही, हे विशेष. २००८मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ६ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
मुख्य म्हणजे भारताने शेवटचा श्रीलंका दौरा २०१७मध्ये केला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ३-० असा क्लीन स्वीप साकारला होता. आता ९ वर्षांनी भारताने पुन्हा श्रीलंकेत मालिका जिंकली.
जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारताचा हा पहिलाच परदेशी भूमीवरील मालिका विजय ठरला, तर कर्णधार म्हणून गिलचा परदेशातील हा पहिलाच मालिका विजय आहे.
भारताला प्रथमच श्रीलंकेविरुद्ध फॉलोऑन लादूनही कसोटी जिंकण्यात अपयश आले. तसेच श्रीलंकेने कसोटी इतिहासात चौथ्यांदा फॉलोऑन पत्करूनही सामना अनिर्णित राखला.
फॉलोऑन पत्करल्यानंतरही एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा दिनुषा हा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी विजय हजारे (वि. ऑस्ट्रेलिया, १९४८) आणि अँडी फ्लॉवर (वि. दक्षिण आफ्रिका, २००१) यांनी हा पराक्रम केला होता.
श्रीलंकेच्या शेवटच्या चार फलंदाजांनी तब्बल २११ धावांची भर घातली. २०२१नंतर प्रथमच असे घडले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ९ बाद ५०३ डाव घोषित
श्रीलंका (पहिला डाव) : २९०
श्रीलंका (दुसरा डाव) : १५४ षटकांत ९ बाद ४२९ (सोनल दिनुषा नाबाद १३३, पसिंदू सूर्याबंदारा ९२; रवींद्र जडेजा ३/९४)
सामनावीर : सोनल दिनुषा
मालिकावीर : देवदत्त पडिक्कल