भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पडिक्कल अन् पावसाचे वर्चस्व; दुसऱ्या दिवसअखेर भारताची ९ बाद ४६० धावांपर्यंत मजल, ध्रुवचे अर्धशतक

भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर प्रामुख्याने वर्चस्व गाजवले.
भारत-श्रीलंका कसोटी मालिका : पडिक्कल अन् पावसाचे वर्चस्व; दुसऱ्या दिवसअखेर भारताची ९ बाद ४६० धावांपर्यंत मजल, ध्रुवचे अर्धशतक
(Photo-X)
Published on

गॉल : भारत-श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर प्रामुख्याने वर्चस्व गाजवले. शतकवीर देवदत्त पडिक्कलने (२३० चेंडूंत १६७ धावा) रविवारी कारकीर्दीतील पहिले दीडशतक साकारले. त्याला ध्रुव जुरेलच्या (६८ चेंडूंत ५१ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ११६ षटकांत ९ बाद ४६० धावांपर्यंत मजल मारली आहे.

गॉल येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा कुलदीप यादव १२, तर प्रसिध कृष्णा १ धावेवर खेळत होते. पावसाच्या व्यत्ययामुळे आणि ओल्या मैदानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी २.३५ वाजता सुरू झाला. तसेच दिवसभरात फक्त ४३ षटकांचाच खेळ शक्य झाला. पहिल्या दिवशी भारताने ७३ षटकांत २ बाद २८८ धावा केल्या होत्या. त्या तुलनेत दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. आता तिसऱ्या दिवशी वरुणराजाने कृपा केली, तर भारतीय संघ डाव घोषित करून श्रीलंकन फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यास आतुर असेल.

२०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या ४४ वर्षीय गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताची कसोटीतील कामगिरी सुमार राहिली आहे. भारताने एकीकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र कसोटीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला मायदेशातच दारुण पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. त्यामुळे गंभीरच्या प्रशिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

इंग्लंडविरुद्ध गतवर्षी भारताने शुभमन गिलच्या नेतृत्वात जेमतेम २-२ अशी बरोबरी साधली. आता अनेक अनुभवी खेळाडू निवृत्त झालेले असताना भारतीय संघ २०२७ या वर्षात प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) सामना खेळत आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये कसोटी सामना खेळला होता. मात्र ती लढत डब्ल्यूटीसीचा भाग नव्हती. त्यामुळे २०२७च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायचे असल्यास भारताला उर्वरित ९ कसोटींमध्ये कामगिरी उंचवावी लागेल.

दरम्यान, पहिल्या दिवशीच्या २ बाद २८८ धावांवरून पुढे खेळताना भारताने उर्वरित १७२ धावा जोडताना ७ फलंदाज गमावले. पहिले सत्र पावसामुळे वाया गेल्यावर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ऋषभ पंत ६२ चेंडूंत ३९ धावांवर बाद झाला. त्याने पडिक्कलसह तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भर घातली. त्यानंतर पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झालेला के. एल. राहुल पुन्हा फलंदाजीस परतला. दुसऱ्या बाजूने कर्नाटकच्या २६ वर्षीय पडिक्कलने २१५ चेंडूंत आपले पहिले दीडशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोला चौकार मारत त्याने हा टप्पा गाठला. राहुल मात्र फक्त ५ धावांची भर घालून ८२ धावांवर बाद झाला. पंतचा बळी मिळवणाऱ्या केशरा नुवांथानेच राहुललाही माघारी पाठवले.

४ बाद ३१९ स्थितीतून मग पडिक्कल व जुरेल यांची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३८ धावांची भर घातली. पडिक्कल पहिले द्विशतक साकारणार असे वाटत असतानाच प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात डिकवेलाने त्याला यष्टिचीत केले. पडिक्कलने १६७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर जुरेलने दुसरे अर्धशतक पूर्ण केले. गेल्या आठ डावांत त्याचे हे पहिलेच अर्धशतक ठरले. रवींद्र जडेजा (१३) व मानव सुतार (२४) यांनीही काहीसा प्रतिकार केला. जयसूर्याने प्रथमच जुरेल, नंतर सुतारचा अडसर दूर केला. मोहम्मद सिराज ११ धावांवर बाद झाला. भारतीय संघ त्यावेळी डाव घोषित करेल असे वाटले, मात्र कुलदीप (नाबाद १२) व कृष्णा (नाबाद १) यांनी उर्वरित ३ षटके फलंदाजी करून दिवसाचा खेळ संपवला. श्रीलंकेकडून जयसूर्याने ४, तर नुवांथाने ३ बळी मिळवले आहेत.

दरम्यान, भारत ४ वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते. त्याशिवाय भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही., हे विशेष. २००८मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ५ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

दिवसभरात फक्त ४३ षटकांचा खेळ

दुसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त ४३ षटकांचा खेळ शक्य झाला. पावसामुळे पहिले सत्र पूर्ण वाया गेले. त्यानंतर भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० नंतर सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी देखील ७३ षटकांचाच खेळ शक्य झाला होता. आता तिसऱ्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे. यासाठी लढत ९.३० वाजता सुरू करण्यात येईल. तसेच ६ वाजेपर्यंत खेळ लांबवला जाऊ शकतो. गॉलच्या खेळपट्टीवर तिसऱ्या ते पाचव्या दिवशी फिरकीपटूंना सर्वाधिक सहाय्य लाभते. त्यामुळे पावसाने खोळंबा न केल्यास चाहत्यांना दर्जेदार लढत पाहायला मिळू शकते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ११६ षटकांत ९ बाद ४६० (देवदत्त पडिक्कल १६७, के. एल. राहुल ८२, ध्रुव जुरेल ५१; प्रभात जयसूर्या ४/१०९)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in