भारत-श्रीलंका कसोटी मालिका : ­भारताला फॉलोऑन लादण्याची संधी; तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची ८ बाद २६५ धावांपर्यंत मजल

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (४७ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू मानव सुथार (८३ धावांत ३ बळी) यांनी मंगळवारी प्रभावी गोलंदाजी केली.
भारत-श्रीलंका कसोटी मालिका : ­भारताला फॉलोऑन लादण्याची संधी; तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची ८ बाद २६५ धावांपर्यंत मजल
भारत-श्रीलंका कसोटी मालिका : ­भारताला फॉलोऑन लादण्याची संधी; तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची ८ बाद २६५ धावांपर्यंत मजल (Photo-X/@BCCI)
Published on

कोलंबो : वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (४७ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू मानव सुथार (८३ धावांत ३ बळी) यांनी मंगळवारी प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑन लादण्याची संधी आहे.

कोलंबोतील सिंहालीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत यजमान श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर ८३.४ षटकांत ८ बाद २६५ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना अद्याप ३९ धावांची आ‌वश्यकता आहे. एकंदर लढतीचा विचार करता भारताच्या पहिल्या डावातील ५०३ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका अद्याप २३८ धावांनी पिछाडीवर आहे. दिवसअखेर प्रतिभावान सोनल दिनुषा (१३७ चेंडूंत नाबाद ८५ धावा) आणि लाहिरू कुमारा (नाबाद ८) यांची जोडी मैदानावर आहे. पसिंदू सूर्याबंदाराने (१३३ चेंडूंत ८० धावा) देखील शानदार अर्धशतक झळकावले.

दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघांतील पहिल्या कसोटीत भारताने १६५ धावांच्या फरकाने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला आता मालिकेत २-० असे निर्भेळ यश (क्लीन स्वीप) संपादन करण्याची संधी आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित ८ लढतींमध्ये चमकदार कामगिरी करणे गरजेचे आहे. पहिल्या कसोटीतील विजयानंतर भारताची टक्केवारी ५३.३३ इतकी असून ते सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलिया (८०), दक्षिण आफ्रिका (७५), न्यूझीलंड (७२.२२), बांगलादेश (५५.५६) हे चार संघ भारतापुढे आहेत. भारत २०२१ व २०२३मध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २०२५मध्ये भारताला ती कामगिरी जमली नाही. त्यामुळे भारत अद्याप पहिल्या डब्ल्यूटीसी जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

तत्पूर्वी, पहिल्या डावात भारताने देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्या शतकाच्या बळावर ९ बाद ५०३ धावांवर डाव घोषित केला. गिल व ऋषभ पंत यांनीही अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची २ बाद ८ धावा अशी स्थिती होती. तेथून पुढे मंगळवारी तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना श्रीलंकेच्या कामिल मिशारा आणि पसिंदू सावध सुरुवात केली. दिवसाच्या सातव्या षटकात कृष्णाने मिशाराचा (१९) अडसर दूर केला. त्यानंतर कामिंदू मेंडिस व सूर्याबंदाराची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. कारकीर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या सूर्याबंदाराने पहिले अर्धशतक साकारले. तर कामिंदूदेखील उत्तम लयीत दिसत होता. अखेर ३०व्या षटकात कृष्णानेच कामिंदूचा (३२) बळी मिळवून ही भागीदारी फोडली. उपहारापर्यंत श्रीलंकेने ४ बाद १३० धावा केल्या होत्या.

दुसऱ्या सत्रात मग सुथार, रवींद्र जडेजा या फिरकीपटूंनी पुढाकार घेत श्रीलंकेची ७ बाद १७३ अशी अवस्था केली. सुथारने कर्णधार धनंजय डीसिल्व्हाला (८) माघारी पाठवले, तर जडेजाने सूर्याबंदाराला ८० धावांवर पायचीत पकडले. निरोशन डिकवेल्ला शून्यावरच मोहम्मद सिराजचा षटकार ठरला. पहिल्या कसोटीतील शतकवीर दिनुषाने मग फिरकीपटू केशरा नुवांथाच्या साथीने डाव सावरला. या दोघांनी चहापानापर्यंत श्रीलंकेला ७ बाद २१६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

तिसऱ्या सत्रात सुथारने नुवांथाला (१८) बाद करून भारताला आठवे यश मिळवून दिले. दिनुषा-नुवांथाने आठव्या विकेटसाठी ५७ धावांची भर घालतानाच तब्बल २३ षटके किल्ला लढवला. मग लाहिरू कुमाराच्या साथीने दिनुषाने झुंज देत संघाला अडीचशेचा पल्ला गाठून दिला. दिनुषाने ६ चौकार व २ षटकारांसह कसोटीतील तिसरे अर्धशतक साकारले. या दोघांनी १५ षटके खेळून काढली. अखेर ८४व्या षटकात पावसाचे आगमन झाल्याने दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे आता बुधवारी चौथ्या दिवशी श्रीलंका किमान ३९ धावा करून फॉलोऑन टाळणार की उर्वरित २ बळी लवकर मिळवूनही भारतीय संघ पुन्हा फलंदाजीस प्राधान्य देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९ बाद ५०३ डाव घोषित (देवदत्त पडिक्कल ११७, ध्रुव जुरेल नाबाद ११५; असिथा फर्नांडो ४/१०६)

श्रीलंका (पहिला डाव) : ८३.४ षटकांत ८ बाद २६५ (सोनल दिनुषा नाबाद ८५, पसिंदू सूर्याबंदारा ८०; प्रसिध कृष्णा ३/४७, मानव सुथार ३/८३)

नऊ वर्षांनी पुन्हा क्लीन स्वीपची संधी

भारत चार वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते.

त्याशिवाय भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही, हे विशेष. २००८मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ५ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

मुख्य म्हणजे भारताने शेवटचा श्रीलंका दौरा २०१७मध्ये केला होता. त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ३-० असा क्लीन स्वीप साकारला होता. आता ९ वर्षांनी पुन्हा एकदा भारताकडे ती संधी आहे.

दोन दिवसांत ४० षटकांचा खेळ वाया

सोमवार आणि मंगळवारच्या दिवसांत मिळून पाऊस तसेच अंधुक सूर्यप्रकाशाच्या कारणास्तव ४० षटकांचा खेळ वाया गेला. दुसऱ्या दिवशी फक्त ५६ षटकांचा खेळ झाला होता, तर मंगळवारी ८० षटकेच टाकण्यात आली. कसोटीत एका दिवशी ९० षटकांचा खेळ होणे अपेक्षित असते. पहिल्या दिवशी ८५ षटके झाली होती. बुधवार आणि गुरुवारी देखील कोलंबो येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्यानुसार रणनीती आखून खेळाची गती वाढवावी लागू शकते. चौथ्या दिवशी अतिरिक्त वेळेपर्यंत खेळ लांबवला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in