सर्फराज की जुरेलला संधी? श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सहाव्या क्रमांकाचा पेच कायम

शनिवारपासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघापेक्षा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्येच अंतिम संघ निवडीवरून मोठे मंथन सुरू आहे.
ध्रूव जुरेलला आणि सर्फराज खान
ध्रूव जुरेलला आणि सर्फराज खान
Published on

कोलंबो : शनिवारपासून गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघापेक्षा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्येच अंतिम संघ निवडीवरून मोठे मंथन सुरू आहे. सहाव्या क्रमांकासाठी सर्फराज खान की ध्रूव जुरेलला संधी द्यायची, याचा पेच निवड समितीला सोडवावा लागणार आहे.

मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर मंगळवारी कोलंबोत दाखल झाल्यामुळे संघ व्यवस्थापनासमोरील निर्णयांचे महत्त्व अधिक वाढले आहे. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशा कायम ठेवण्यासाठी योग्य ११ खेळाडूंची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

संघात मध्य फळीतील फलंदाजी आणि गोलंदाजीच्या रचनेवर मुख्य चर्चा केंद्रित आहे. विशेषतः ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, यावर माजी खेळाडूंमध्ये मतप्रवाह दिसून येत आहेत. माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या मते, ध्रुव जुरेलने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. सर्फराजला पुढे संधी मिळेल, असे मोरे यांनी सांगितले.

ध्रुव जुरेलने १० कसोटी सामन्यांत ३४.१४ च्या सरासरीने ४७८ धावा केल्या असून यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. मात्र, फिरकी गोलंदाजीसमोर तो ज्या प्रकारे बाद झाला आहे, ती चिंतेची बाब ठरली आहे.

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याच्या मते, सर्फराज खानला प्राधान्य दिले पाहिजे. संघात आधीपासून असलेल्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा असेल तर जुरेलला संधी मिळू शकते. सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६२ सामन्यांत ६४.७३ च्या सरासरीने ५,११४ धावा केल्या असून यात १७ शतकांचा समावेश आहे.

देवदत्त पडिक्कलचे स्थान पक्के

निवड समितीसमोर सहाव्या क्रमांकाचा पेच कायम असला तरी सराव सामन्यात नाबाद १४२ धावांची खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावरील आपली दावेदारी मजबूत केली आहे. साई सुदर्शन जायबंदी झाल्यामुळे हे स्थान रिक्त झाले होते. त्यामुळे आता सहाव्या क्रमांकासाठीची लढत तीव्र झाली आहे. सर्फराज किंवा जुरेल यांपैकी कुणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in