कुशल मेंडिस, निसांका श्रीलंका संघातून बाहेर; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर

भारताविरुद्ध १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज कुशल मेंडिस आणि पथुम निसांका दुखापतीमुळे या पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत.
कुशल मेंडिस, निसांका श्रीलंका संघातून बाहेर; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर
कुशल मेंडिस, निसांका श्रीलंका संघातून बाहेर; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर
Published on

कोलंबो : भारताविरुद्ध १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज कुशल मेंडिस आणि पथुम निसांका दुखापतीमुळे या पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी अष्टपैलू खेळाडू धनंजय डीसिल्व्हाच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यांचा संघ जाहीर केला. १९ जुलै रोजी कोलंबोतील एसएससी मैदानावर लंका प्रीमियर लीगदरम्यान धाव घेताना कुशल मेंडिसच्या उजव्या पायाच्या स्नायूला (हॅमस्ट्रिंग) दुखापत झाली होती. तो सध्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये वैद्यकीय पुनर्वसनाखाली आहे.

दुसरीकडे, पथुम निसांका याच्या मनगटावर गेल्या महिन्यात लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली असून तो त्यातून सावरत आहे. हे दोघे उपलब्ध नसल्याने निवडकर्त्यांनी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला याला पुन्हा संधी दिली आहे. ५४ कसोटींचा अनुभव असलेल्या डिकवेलाने २०२३ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. सराव सामन्यात खेळलेल्या अंजला बंधारा याच्याऐवजी डिकवेलाला पसंती देण्यात आली आहे. सराव सामन्यात ३ बळी घेणाऱ्या ऑफ-स्पिन गोलंदाज केशरा नुवांथा याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे, तर कासुन रजिथा आणि इसिथा विजेसुंदरा यांना संघातून वगळण्यात आले आहे. दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्टदरम्यान कोलंबोतील एसएससी मैदानावर खेळवला जाईल.

निशान मदुष्काला पुन्हा संधी

भारताविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात ६६ आणि नाबाद ६३ धावा करणाऱ्या निशान मदुष्काने आपले स्थान कायम राखले आहे. फलंदाजीची धुरा डीसिल्व्हा, उपकर्णधार कामिंदू मेंडिस, दिनेश चंडिमल, लाहिरू उदारा, पासिंदू सुरियाबंदरा आणि सोनल दिनुषा यांच्यावर असेल. फिरकीची जबाबदारी प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस आणि नुवांथा यांच्याकडे असेल. वेगवान गोलंदाजीत असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, मिलान रत्नायके आणि दिलशान मदुशंका यांचा समावेश आहे.

श्रीलंका संघ :

धनंजय डीसिल्व्हा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडिमल, पासिंदू सुरियाबंदरा, सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशरा नुवांथा, मिलान रत्नायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, दिलशान मदुशंका.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in