IND vs WI, 2nd Test : क्लीन स्वीपसाठी भारत सज्ज; अरुण जेटली स्टेडियमवर आजपासून विंडीजशी दुसरा कसोटी सामना

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. शुक्रवारपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे.
IND vs WI, 2nd Test : क्लीन स्वीपसाठी भारत सज्ज; अरुण जेटली स्टेडियमवर आजपासून विंडीजशी दुसरा कसोटी सामना
Published on

नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. शुक्रवारपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. ही लढत जिंकून मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवण्याचे भारताचे ध्येय आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता २५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांवरही टीका झाली. तर खेळपट्टीही गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. आता दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांतील फलंदाज धावांच्या राशी उभारण्यास आतुर असतील. कोटलाची खेळपट्टी फलंदाजांना पोषक असण्याची शक्यता असून ही लढत किमान चौथ्या दिवसापर्यंत लांबावी, अशी अपेक्षा आहे. फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे आशिया चषक खेळून लगेचच कसोटी मालिकेसाठी दाखल झाले. त्यामुळे बुमरा किंवा कुलदीपला या लढतीसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

पहिल्या कसोटीत भारताकडून के. एल. राहुल, रवींद्र जडेजा व ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली. विंडीजचा पहिला डाव १६२ धावांत गुंडाळल्यावर भारताने ५ बाद ४४८ धावांपर्यंत मजल मारून पहिला डाव घोषित केला. मग विंडीजचा दुसरा डाव भारताने तिसऱ्या दिवशी ४५.१ षटकांत १४६ धावांत गुंडाळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती.

वेस्ट इंडिजचा संघ रॉस्टन चेसच्या नेतृत्वात खेळत आहे. शामर जोसेफ व अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने विंडीजची गोलंदाजी कमकुवत वाटत आहे. फलंदाजही संघर्ष करत आहेत. अशा स्थितीत ते भारताला दुसऱ्या कसोटीत कसे आव्हान देणार, याकडे लक्ष असेल.

सुदर्शनला आणखी एक संधी?

साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर अद्याप छाप पाडू शकलेला नाही. त्यामुळे त्याला आणखी एक संधी दिली जाणार का, याकडे लक्ष असेल. पहिल्या कसोटीत सुदर्शनने १९ चेंडूंत फक्त ७ धावा केल्या. या मालिकेनंतर थेट नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातच दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल असे युवा फलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहेत. २३ वर्षीय सुदर्शनसाठी ही अखेरची संधी ठरू शकते. यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेल चमक दाखवत असल्याने नारायण जगदीशनला मात्र प्रतीक्षा करावी लागू शकते.

फलंदाज लयीत, गोलंदाज ऐटीत

सुदर्शन वगळता भारताच्या सर्व फलंदाजांनी पहिल्या कसोटीत छाप पाडली. राहुल, जडेजा, जुरेल यांनी शतके साकारली, तर गिलनेही अर्धशतक झळकावले. आता दुसऱ्या कसोटीतसुद्धा भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात फारसा बदल अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजांमध्ये बळी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. बुमरा व मोहम्मद सिराज यांच्या वेगवान जोडीने पहिल्या डावात विंडीजला गुंडाळले, तर कुलदीप, जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांचे फिरकी त्रिकुट दुसऱ्या डावात भारी पडले. एकूणच भारताचे गोलंदाजी पंचक विंडीजच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले आहे. एखाद्या फिरकीपटू अथवा बुमराला विश्रांती देत अक्षर पटेलला या कसोटीसाठी भारतीय संघ संधी देऊ शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी, नारायण जगदीशन, प्रसिध कृष्णा.

  • वेस्ट इंडिज : रॉस्टन चेस (कर्णधार), टेगनारायण चंद्रपॉल, ब्रँडन किंग, केव्हलॉन अँडरसन, शाय होप, जोमेल वॉरिकन, जॉन कॅम्पबेल, अलिक अथांझे, टेव्हिन एमलाच, जस्टिन ग्रीव्हस, अँडरसन फिलिप, जेडन सील्स, खैरी पेरी, जॉन लेन, जेदिया ब्लेड्स.

  • वेळ : सकाळी ९.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

उभय संघांत आतापर्यंत १०१ कसोटी सामने झाले असून भारताने त्यापैकी २४, तर वेस्ट इंडिजने ३० लढती जिंकल्या आहेत. ४७ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in