IND vs WI, 2nd T20I : रांचीत धावांचा वर्षाव अपेक्षित; श्रेयसची सेना सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज; विंडीजविरुद्ध आज लढत

कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या टी-२० सामन्यात शानदार शतक झळकावत टीकाकारांची तोंडे बंद केली.
IND vs WI, 2nd T20I : रांचीत धावांचा वर्षाव अपेक्षित; श्रेयसची सेना सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज; विंडीजविरुद्ध आज लढत
IND vs WI, 2nd T20I : रांचीत धावांचा वर्षाव अपेक्षित; श्रेयसची सेना सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज; विंडीजविरुद्ध आज लढत(Photo-X)
Published on: 

रांची : कर्णधार श्रेयस अय्यरने पहिल्या टी-२० सामन्यात शानदार शतक झळकावत टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या लढतीतही श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयी कामगिरीसाठी सज्ज आहे. रांची येथील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत धावांचा वर्षाव अपेक्षित आहे. संजू सॅमसनवर या लढतीत पुन्हा एकदा नजरा असतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर भारतीय संघ आता विंडीजविरुद्ध दोन हात करत आहे. उभय संघांत लखनौ येथे झालेल्या पहिल्या लढतीत भारताने बाजी मारली. विशेषत: श्रेयसने गेल्या काही महिन्यांतील अपयश पुसून काढले. श्रेयसच्या नेतृत्वात भारताने जून-जुलै महिन्यात आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावली होती. मग झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानसारख्या क्रमवारीत खाली असलेल्या संघाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्या. नुकताच झालेल्या आशियाई स्पर्धेतही श्रेयसला दोन सामन्यांत १००च्या स्ट्राइक रेटनेदेखील धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्यावर फलंदाजीत छाप पाडण्याचे दडपण होते. श्रेयसला सूर गवसल्याने मधल्या फळीत तिलक वर्मा व इशान किशन यांच्यावरील दडपण कमी झाले असेल.

गोलंदाजीत भारताला सुधारणेला वाव आहे. मयांक यादवने पहिल्या षटकात १६ धावा दिल्या. त्यानंतरही तो महागडा ठरला. मात्र, निर्णायक क्षणी त्याने वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा शर्फेन रदरफोर्ड याची विकेट घेतली. नितीश रेड्डीला संघात घेऊन त्याच्यावर नव्या चेंडूची जबाबदारी सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकतो. मात्र, एकदिवसीय मालिकेत हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नव्हता. फिरकी विभाग मात्र स्थिर दिसत आहे. अनुभवी अक्षर पटेलसोबत कुलदीप यादवने प्रभावी गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. नवोदित अष्टपैलू नमन धीरनेही ऑफस्पिनच्या जोरावर ३१ धावांत तीन विकेट घेतले.

घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध शेवटच्या ११ सामन्यांपैकी १० सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. तसेच २०१७ नंतर विंडीजने भारताला भारतामधील टी-२० मालिकेत एकदाही नमवलेले नाही. २०२२नंतर विंडीज संघ प्रथमच भारतीय दौऱ्यावर टी-२० मालिका खेळत आहे.

सॅमसनवर दडपण; वैभव प्रतीक्षेत

अनुभवी सलामीवीर संजू सॅमसनचा खराब फॉर्म हा सध्या फलंदाजीत एकमेव चिंतेचा विषय आहे. टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सॅमसनला आशियाई स्पर्धेसह पहिल्या लढतीत चमक दाखवता आली नाही. गेल्या चार डावांत सॅमसनने अनुक्रमे ९, ७, २, ११ अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अभिषेक शर्मासोबत सलामीसाठी संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभवला अद्याप अपेक्षेप्रमाणे मोठी धावसंख्या उभारता आलेली नसली, तरी त्याची आक्रमक फटकेबाजी आणि टी-२०मधील नैसर्गिक शैली लक्षवेधी ठरली आहे. अभिषेक, इशान किशन, तिलक वर्मा व शिवम दुबे या डावखुऱ्या फलंदाजांची चौकटी मात्र उत्तम लयीत आहे.

फलंदाजांवर विंडीजची मदार

वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यातील १७१ धावांच्या तुलनेत यावेळी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. शाय होपच्या नेतृत्वाखालील संघात शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस आणि रोमारियो शेफर्ड यांसारखे टी-२० क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज आहेत. फलंदाजी हीच वेस्ट इंडिजची सर्वात मोठी ताकद असून, गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू अकील होसेन वगळता फारशी धार दिसलेली नाही. वेस्ट इंडिज हा कोणत्याही दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करण्यास सक्षम असा घातक टी-२० संघ आहे. कर्णधार होपशिवाय त्यांची फलंदाजी प्रामुख्याने हेटमायर, पॉवेल आणि विरोधी संघाचा नंबर एक टी-२० फलंदाज शर्फेन रुदरफोर्ड यांच्यावर अवलंबून असेल. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती आणि चेसची ऑफ-स्पिन गोलंदाजी त्यांच्या आक्रमणाला अधिक धार देईल.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

२०२३नंतर प्रथमच रांची येथे आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होत आहे. त्यावेळी न्यूझीलंडने भारताविरुद्ध १७६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. येथील गेल्या १० टी-२० सामन्यांपैकी फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० धावांचा आकडा गाठला आहे. वातावरण थंड राहण्याची शक्यता असून पावसाची २० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर.

वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), ज्वेल अँड्रू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिम्रॉन हेटमायर, अकील होसेन, आमिर जांगू, शामर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शर्फेन रुदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमारिओ शेफर्ड, शामर स्प्रिंगर.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in