

हरारे : आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अपयश बाजूला सारून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय टी-२० संघ आता नव्या आव्हानासाठी सज्ज आहे. भारत-झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला वगळण्यात आले असल्याने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी सलामीला येणार असल्याचे स्पष्ट आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. मात्र आयर्लंडविरुद्ध ०-२, तर इंग्लंडविरुद्ध ०-४ अशा फरकाने भारताला टी-२० मालिका गमवावी लागली. प्रशिक्षक गौतम गंभीरवरही या पराभवाचे खापर फोडण्यात आले आहे. आता या दौऱ्यासाठी गंभीर विश्रांतीवर असल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.
दरम्यान, हरारे स्पोर्ट्स क्लबचे मैदान अभिषेक शर्मा आणि वैभव दोघांसाठीही खास आहे. अभिषेकने याच मैदानावर पदार्पण करत दुसऱ्याच सामन्यात पहिले टी-२० शतक ठोकले होते, तर वैभवने ६ फेब्रुवारी रोजी याच मैदानावर युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या संघाविरुद्ध शतक झळकावले होते. येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याने फलंदाजांसमोर आव्हान असेल. वैभवने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. मात्र तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे १४, १३, १५ अशा धावा केल्या. त्यामुळे वैभववरही आता कामगिरी उंचावण्याचे दडपण असेल.
उपकर्णधार तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर चाचपडताना दिसत असल्याने लक्ष्मण त्याला कुठे फलंदाजीला पाठवतात, हे पाहणे रंजक ठरेल. तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशनला संधी दिली जाईल. त्याचप्रमाणे शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांच्यापैकी एकाची निवड करताना संघ व्यवस्थापनाची कसरत होणार आहे. मयांक यादव, अशोक शर्मा, प्रिन्स यादव, यश ठाकूर या नवोदित गोलंदाजांपैकी तिघांची निवड करावी लागणार आहे. फिरकीची धुरा रवी बिश्नोई व हर्ष दुबे वाहतील. झिम्बाब्वेचे नेतृत्व सिकंदर रझा करणार असून ते भारताला नमवण्यासाठी आतुर असतील.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, अशोक शर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, इशान किशन, प्रभसिमरन सिंग, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, मयांक यादव, यश ठाकूर.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, टनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ले मधेवेरे, ताडिवानाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, ब्लेसिंग मुझरबानी, डायन मेयर्स, रिचर्ड एन्गरावा, न्यूमन न्यामुरी, मिल्टन शुंबा, ताफाझ्वा सिगा.
वेळ : दुपारी ४.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स वाहिनी आणि फॅनकोड ॲप