

ग्लासगो : ग्लासगो येथे सुरू असलेल्या २३व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारचा दिवस भारताच्या वेटलिफ्टर्सनी गाजवला. पुरुषांमध्ये मुथूपंडी राजा, तर महिलांमध्ये ज्ञानेश्वरी यादवने आपापल्या वजनी गटात रौप्यपदक काबिज केले. त्यानंतर रात्री १०च्या सुमारास महिलांमध्ये बिंद्याराणी देवीने कांस्यपदक जिंकून भारताच्या खात्यात दिवसातील तिसऱ्या पदकाची भर घातली. भारताची एकूण पदकसंख्या आता ६ झाली असून यामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत तूर्तास आठव्या स्थानी आहे.
भारताची २३ वर्षीय वेटलिफ्टर ज्ञानेश्वरीने महिलांच्या महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करत भारताची पदकांची घोडदौड कायम राखली आहे. सोमवारी झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात विक्रम मोडण्याच्या शर्यतीत तिने एकूण १९९ किलो (स्नॅच ८८ किलो + क्लीन अँड जर्क १११ किलो) वजन उचलून हे यश संपादन केले. नायजेरियाच्या ओमोलोला दिदिहने २०६ किलो (९३+११३) वजन उचलून राष्ट्रकुल व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे नवे विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले.
दरम्यान, ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतच भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.
छत्तीसगडच्या भोंडिया या लहानशा खेड्यातील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वरीने स्नॅच प्रकारात स्वतःच्या ८८ किलो वजनाच्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. तसेच क्लीन अँड जर्क प्रकारात १११ किलो आणि एकूण १९९ किलो वजन उचलून नवी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आनंद व्यक्त करताना ज्ञानेश्वरी म्हणाली, “मी अत्यंत आनंदी असून मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची होती आणि ती करण्यात मला यश आले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू ही माझी प्रेरणा असून तिने सुवर्णपदक जिंकल्यावर मला मोठा उत्साह मिळाला.”
एसईसी आर्मडिलो स्टेडियमवर भारत आणि नायजेरियाच्या या दोन तरुण खेळाडूंमध्ये विक्रमी चुरस पाहायला मिळाली. ज्ञानेश्वरीने क्लीन अँड जर्कमध्ये १०७ किलो वजन उचलून प्रथम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम नोंदवला. त्यानंतर दिदिहने ११० किलो वजन उचलून तो मोडला. ज्ञानेश्वरीने पुन्हा जिद्द दाखवत १११ किलो वजन उचलून पुन्हा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, दिदिहने पुढील मिनिटातच ११३ किलो वजन उचलून सुवर्णपदक आणि विक्रम दोन्हीवर आपले नाव कोरले. हे या स्पर्धेतील भारताचे वेटलिफ्टिंगमधील चौथे आणि एकंदरीत पाचवे पदक ठरले.
वेटलिफ्टिंगव्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांतही भारताने चांगली कामगिरी केली. विशेषत: बॉक्सिंगमध्ये भारताने विविध वजनी गटांत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुढील काही दिवसांत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राही मैदानात दिसेल. नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. तसेच ऑलिम्पिकपदक विजेती लव्हलिना बोर्गोहैनदेखील राष्ट्रकुलमध्ये किमान रौप्यपदक जिंकेल, अशी आशा तमाम चाहत्यांना आहे.
अखेर वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
ज्ञानेश्वरीचे हे रौप्यपदक तिच्या वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या खेळाडूच्या स्वप्नाची फलश्रुती आहे. तिचे वडील दीपक यादव यांचे बॉडीबिल्डर बनण्याचे स्वप्न होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना खेळ सोडावा लागला आणि ते विजेचे तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन) म्हणून काम करू लागले. कोरोनाच्या काळात सप्लीमेंट्स खरेदी करणे कठीण झाले होते, तरीही त्यांनी मुलीचे स्वप्न जिवंत ठेवले. सुरुवातीला पॉवरलिफ्टिंग करणाऱ्या ज्ञानेश्वरीने नंतर ऑलम्पिक वेटलिफ्टिंगकडे मोर्चा वळवला. २०२२ मधील कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील पदकाने तिला या खेळात यश मिळवण्याचा विश्वास दिला होता.
राजाची रौप्यपदकावर मोहोर
ग्लासगो : भारताचा वेटलिफ्टर राजा मुथुपंडी याने आपल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदार्पणातच चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. या पदकासह भारताने वेटलिफ्टिंगमधील तिन्ही स्पर्धांमध्ये किमान एक पदक निश्चित करण्याचा पराक्रम केला.
राजाने स्नॅच प्रकारात १२६ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १६० किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. मलेशियाच्या मुहम्मद अझनिल बिन बिदिन याने एकूण २९९ किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर पापुआ न्यू गिनीच्या मोरया बारू याने २८२ किलो वजनासह कांस्यपदक मिळवले.
दरम्यान, ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी सहभागी झाले आहेत.
भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये पाच पदके जिंकली आहेत. रविवारी मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर आता राजा, ऋषिकांत, ज्ञानेश्वरी यांच्या रौप्यपदकाची व बिंद्याराणीच्या कांस्यपदकाची त्यामध्ये भर पडली. पुढील काही दिवसांत भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडेल.
बिंद्याराणीला यंदा कांस्यवर समाधान
ग्लासगो : महिलांच्या ५८ किलो वजनी गटात भारताच्या बिंद्याराणी देवीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील भारताचे हे वेटलिफ्टिंगमधील पाचवे तर एकंदरीत सहावे पदक ठरले. बिंद्याराणीने स्नॅच प्रकारात ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ११२ किलो असे एकूण १९९ किलो वजन उचलून तिसरे स्थान पटकावले. स्नॅच प्रकारात तिने पहिल्या प्रयत्नात ८३ किलो वजन उचलले, दुसऱ्या प्रयत्नात ८५ किलो, तर तिसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. नायजेरियाच्या राफियातू फोलाशेड हिने एकूण २२९ किलो वजनाचा नवा विक्रम रचत सुवर्णपदक जिंकले.