जडेजा उपकर्णधार, करुणला डच्चू! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; बुमरासुद्धा उपलब्ध

वेस्ट इंडिजविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
जडेजा उपकर्णधार, करुणला डच्चू! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; बुमरासुद्धा उपलब्ध
Published on

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला या मालिकेसाठी संघात कायम राखण्यात आले असून जायबंदी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत अनुभवी डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. करुण नायरला मात्र संघातून डच्चू देण्यात आला आहे.

एकीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धेत खेळत आहे. २८ तारखेला ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच २ ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघात एकूण १५ जणांचा समावेश आहे. अनुक्रमे अहमदाबाद (२ ते ६ ऑक्टोबर) व दिल्ली (१० ते १४ ऑक्टोबर) येथे उभय संघांत दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. तसेच भारत-अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी व इराणी चषकासाठी शेष भारताचा संघही यावेळी जाहीर करण्यात आला.

गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्या मालिकेत ३१ वर्षीय बुमरा तीनच सामने खेळला होता. जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली पाठदुखी व वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव बुमराला सामन्यांची योग्य निवड करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यामुळे आधी २८ तारखेनंतर आशिया चषकाची अंतिम फेरी खेळल्यावर बुमरा लगेच कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल का, याविषयी शंका होती. मात्र बुमराने स्वत:च आपण या मालिकेत खेळू, असे बीसीसीआयला कळवले. त्यामुळे तो, सिराज व प्रसिध कृष्णा विंडीजविरुद्ध भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहतील.

३३ वर्षीय करुणने मात्र संघातील स्थान गमावले आहे. जवळपास ९ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कर्नाटकच्या करुणने इंग्लंड दौऱ्यातील चार सामन्यांत एका अर्धशतकासह फक्त २०५ धावा केल्या. त्यामुळेच त्याच्या जागी कर्नाटकचाच २५ वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संघात स्थान देण्यात आले आहे. पडिक्कलने नुकताच सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही दमदार शतक झळकावले होते. पडिक्कलला फक्त दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असून मार्च २०२४मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळला.

पडिक्कल संघात परतला असला तरी, तिसऱ्या क्रमांकासाठी डावखुऱ्या साई सुदर्शनला प्रथम पसंती दिली जाईल, हे स्पष्ट आहे. सुदर्शनने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटींमध्ये एका अर्धशतकासह एकूण १४० धावा केल्या. मात्र वय ही त्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळेच ३३ वर्षीय करुणऐवजी २३ वर्षीय सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, २७ वर्षीय पंतला इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना उजव्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली. त्यामुळे पंत आशिया चषकासह आता कसोटी मालिकेलाही मुकणार आहे. त्यामुळेच ३६ वर्षीय जडेजाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. प्रदीर्घ कारकीर्दीत जडेजा प्रथमच कसोटी संघाचा उपकर्णधार असेल. रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर जडेजावर भारताच्या फिरकीची भिस्त असेल. त्याला कुलदीप यादव, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर या अन्य फिरकीपटूंची साथ लाभेल. फलंदाजीत गिलसह के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल यांच्यावर प्रामुख्याने भारतीच मदार असेल. अष्टपैलूंचे योगदान मालिकेत मोलाचे ठरेल.

  • इंग्लंड दौऱ्यातील हे खेळाडू संघाबाहेर : करुण नायर, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, अभिमन्यू ईश्वरन, आकाश दीप, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग. (पंत व आकाश दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत.)

  • या खेळाडूंचा समावेश : देवदत्त पडिक्कल, अक्षर पटेल, नारायण जगदीशन.

भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, नारायण जगदीशन, प्रसिध कृष्णा.

जुरेल, जगदीशन यष्टिरक्षणाचे पर्याय

पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल हा पहिल्या पंसतीचा यष्टिरक्षक असेल. जुरेलने इंग्लंडविरुद्धसुद्धा पर्यायी यष्टिरक्षक म्हणून पंतच्या जागी भूमिका बजावली. तसेच ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध पहिल्या कसोटीत शतक झळकावले. त्याशिवाय नारायण जगदीशनही संघात आहे. जगदीशनने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण विभागाकडून खेळताना १९७, ५२ अशा धावा केल्या.

मुंबईकर सर्फराझची प्रतीक्षा कायम

मुंबईचा २७ वर्षीय फलंदाज सर्फराझ खानचा विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी पाचव्या किंवा सहाव्या स्थानासाठी विचार केला जाईल, असे वाटले होते. मात्र सर्फराझ अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याचे समजते. बुची बाबू स्पर्धेत सर्फराझला दुखापत झाली होती. तसेच त्याने १० ते १५ किलो वजन कमी केल्याचेही वृत्त होते. मात्र तूर्तास संघ व्यवस्थापनाने पडिक्कलला मधल्या फळीसाठी प्राधान्य दिले असून सर्फराझला तंदुरुस्ती सिद्ध करून संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. सर्फराझ २०२४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळला आहे. त्या मालिकेत ३ सामन्यांत सर्फराझला एक शतक वगळता फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे सर्फराझ सध्या भारतीय संघाबाहेर आहे.

logo
marathi.freepressjournal.in