भारताला ८५ पदकांचा मान, सायोनारा जपान! आशियाई क्रीडा स्पर्धेचे २०वे पर्व उत्साहात संपन्न; भारत सलग दुसऱ्यांदा चौथ्या स्थानी

Asian Games 2026 : जपानची संस्कृती आणि आदरातिथ्याचे सुंदर दर्शन घडवणारी रोषणाई, संगीताचा रंजक कार्यक्रम, आशियाच्या एकतेचा संदेश आणि सहभागी देशांच्या संचलनासह २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा थाटात पार पडला.
भारताला ८५ पदकांचा मान, सायोनारा जपान! आशियाई क्रीडा स्पर्धेचे २०वे पर्व उत्साहात संपन्न; भारत सलग दुसऱ्यांदा चौथ्या स्थानी
भारताला ८५ पदकांचा मान, सायोनारा जपान! आशियाई क्रीडा स्पर्धेचे २०वे पर्व उत्साहात संपन्न; भारत सलग दुसऱ्यांदा चौथ्या स्थानीX
Published on: 

नागोया : जपानची संस्कृती आणि आदरातिथ्याचे सुंदर दर्शन घडवणारी रोषणाई, संगीताचा रंजक कार्यक्रम, आशियाच्या एकतेचा संदेश आणि सहभागी देशांच्या संचलनासह २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा थाटात पार पडला.

१९ सप्टेंबरपासून आयची-नागोया (जपान) येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत ४४ देशांतील १० हजारांहून अधिक क्रीडापटू यामध्ये सहभागी झाले होते. दोन आठवड्यांहून अधिक रंगलेल्या या स्पर्धांमध्ये किमान ५० जागतिक विक्रमांसह ३५० हून अधिक विक्रम नोंदवले गेले आणि अखेर विविध आव्हानांवर मात करत सर्व देशांच्या खेळाडूंनी मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियमवर एकत्र येऊन महोत्सवी वातावरणात सहभाग घेतला. या स्पर्धांचा समारोप समारंभ ९० मिनिटे चालला.

चीनने सलग १२व्यांदा पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले. त्यांनी १६९ सुवर्ण, ८९ रौप्य आणि ८३ कांस्यपदकांसह एकूण ३४१ पदके जिंकत परदेशातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके मिळवत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. २०२३च्या हांगझो येथील स्पर्धेच्या तुलनेत भारताची २१ पदके कमी झाली. मात्र भारताने २०२३ प्रमाणेच यंदाही पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखले. २०२३मध्ये भारताने एकूण २८ सुवर्णपदकांसह तब्बल १०६ पदके पटकावली होती. यंदा यजमान जपानने ८३ सुवर्ण, ९५ रौप्य, ९१ कांस्यपदकांसह एकूण २६९ पदके मिळवत दुसरे स्थान मिळवले, तर दक्षिण कोरियाने ३९ सुवर्ण, ४३ रौप्य, ६८ कांस्य अशी एकूण १५० पदके पटकावली.

आशियाई ऑलिम्पिक कौन्सिलचे अध्यक्ष शेख जोआन बिन हमाद यांनी प्रिन्स आणि प्रिन्सेस अकिशिनो यांच्या उपस्थितीत स्पर्धा समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर ‘ओसीएचा ध्वज’ २०३०मध्ये दोहा, कतार येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीच्या प्रतिनिधीकडे सोपवण्यात आला. या ध्वज हस्तांतरण कार्यक्रमात कतारचे ऑलिम्पिक व जागतिक विजेते मुताझ बाशिम सहभागी झाले होते.

ओसीएचे अध्यक्ष बिन हमाद यांनी सांगितले की, “या स्पर्धकांनी आशियाई क्रीडा खेळांची उंची वाढवली आहे. जरी ही मशाल विडा शांत झाली असली, तरी त्यामुळे पेटवलेल्या आशा आपल्या खंडात तेवत राहतील.” या स्पर्धेत भारतासह आशियाई खेळाडूंनी संस्मरणीय पुनरागमन आणि शेवटच्या क्षणापर्यंतची चुरस अनुभवली आहे. समारोपाच्या कार्यक्रमात जपानची परंपरा असलेला ‘बोन-ओदोरी’ नृत्यप्रकार आणि नागोजात लोकप्रिय असलेला ‘मात्सुकेन साम्बा टू’ हा गाणे सादर करण्यात आले. यावेळी करण्यात आलेली रोषणाई पाहण्याजोगी होती.

दरम्यान, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलहमान यांच्याकडे ध्वज सुपूर्द करण्यात आला आणि कतारचा घोडदवार जसीम अल कुवारी याने घोड्यावर स्वार होऊन मैदान गाजवले. अशाप्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा संपन्न झाला. आता २०२८मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी सर्व खेळाडू तयारीला लागतील.

नीरूने केले भारताचे नेतृत्व

भारतीय पथकाकडून दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकणारी ट्रॅप शूटर नीरू धंडा हिच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० भारतीय खेळाडू व अधिकारी पांढऱ्या व निळ्या रंगाचे पोशाख परिधान करून आणि तिरंगा फडकवत परेडमध्ये सहभागी झाले होते. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत ध्वजवाहक होते, तर समारोप सोहळ्यासाठी नीरूला हा मान देण्यात आला.

हे माहीत आहे का?

भारत आणि उझबेकिस्तान यांच्या नावे समान २१ सुवर्णपदके जमा आहेत. मात्र भारताने उझबेकिस्तानच्या तुलनेत २ रौप्यपदके अधिक जिंकली. भारताने २७, तर उझबेकिस्तानने २५ रौप्यपदके पटकावली. त्यामुळे भारताने चौथे स्थान मिळवले, तर उझबेकिस्तानला सलग दुसऱ्या आशियाई स्पर्धेत पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in