दुबई : प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्माने (५३ चेंडूंत नाबाद ६९ धावा) रविवारी रात्री दडपणाखाली कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. त्याला मुंबईकर शिवम दुबेची (२२ चेंडूंत ३३ धावा) सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने विजयानवमी साजरी करताना आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
भारताने एकंदर नवव्यांदा आशिया चषक उंचावताना पाकिस्तानला ५ गडी व २ चेंडू राखून पराभूत केले. मात्र भारताच्या विजयापेक्षा त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींची सगळीकडे अधिक चर्चा सुरू आहे. भारताने स्पर्धा जिंकल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास मनाई करत चषकाच्या आभासी प्रतिकृतीसह जल्लोष केला. तसेच संघातील बहुतांश खेळाडूंनीसुद्धा ट्विटरवर अशाच स्वरूपाचे छायाचित्र टाकून एकप्रकारे पाकिस्तानची हुर्यो उडवली.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७ वे पर्व पार पडले. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात, तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ होते. भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली, तर पाकिस्तानने दुसरे स्थान मिळवले. दुसरीकडे, श्रीलंकेने ब-गटात सलग तीन लढती जिंकून पहिला क्रमांक मिळवला, तर बांगलादेशने दुसरे स्थान मिळवले.
त्यानंतर गेल्या आठवडाभर रंगलेल्या सुपर-फोर फेरीत भारताने सलग दोन लढती जिंकून थाटात सर्वप्रथम अंतिम फेरी गाठण्याचा मान मिळवला. भारताने प्रथम पाकिस्तानला ६ गडी राखून धूळ चारली. मग बांगलादेशवर ४१ धावांनी वर्चस्व गाजवले. श्रीलंकेलाही नमवून भारताने सुपर-फोर फेरीत अग्रस्थान मिळवत एकंदर ११व्यांदा अंतिम फेरी गाठली.
दरम्यान, अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत १४६ धावांत गारद झाला. सलामीवीर साहिबझादा फरहानने ३८ चेंडूंत ५७ धावांची खेळी साकारली, तर फखर झमानने ४६ धावा केल्या. त्यामुळे ९ षटकांत ते एकवेळ बिनबाद ८४ अशा सुस्थितीत होते. मात्र चायनामन कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती व अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाने पाकिस्तानला रोखले. विशेषत: कुलदीपने एकाच षटकात कर्णधार सलमान अली (८), शाहीन आफ्रिदी (०) व फहीम अश्रफ (०) यांचे बळी मिळवले. जसप्रीत बुमराने हारिस रौफचा त्रिफळा उडवून अनोख्या शैलीत सेलिब्रेशन केले, तर बुमरानेच मोहम्मद नवाझला बाद करून पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा (५), शुभमन गिल (१२) व सूर्यकुमार (१) हे पहिल्या चार षटकांतच माघारी परतल्याने भारतीय संघ ३ बाद २० अशा संकटात सापडला. तेथून मग २२ वर्षीय तिलक व संजू सॅमसन यांनी डोलारा सावरताना चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भर घातली. सॅमसन (२४) माघारी परतल्यावर दुबे व तिलक यांनी धावगती वाढवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी झटपट ६० धावांची भागीदारी रचून संघाला विजयासमीप नेले. तिलकने ३ चौकार व ४ षटकारांसह चौथे अर्धशतक साकारले. दुबे १९व्या षटकात बाद झाला.
अखेरीस ६ चेंडूंत १० धावांची गरज असताना तिलकने रौफच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावून विजय पक्का केला. मग चौथ्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. संस्मरणीय खेळी साकारणारा तिलक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर ७ सामन्यांत ३१४ धावा फटकावणारा भारताचा सलामीवीर अभिषेक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
पाकिस्तानविरुद्ध विजयाची मालिका कायम
१९८४ पासून आयोजित करण्यात येणाऱ्या आशिया चषकाचे यंदा १७वे पर्व होते. तेव्हापासून आजवर एकदाही भारत-पाकिस्तान या स्पर्धेतील अंतिम फेरीत एकमेकांसमोर आलेले नव्हते. मात्र यावेळी भारताने त्यांना एकाच स्पर्धेत तीन वेळा नमवण्यासह जेतेपद काबिज केले. आतापर्यंत भारताने सर्वाधिक ९ वेळा ही स्पर्धा जिंकली असून त्यांनी अंतिम फेरीत ६ वेळा श्रीलंकेला, २ वेळा बांगलादेशला, तर एकदा पाकिस्तानला नमवले आहे. यापूर्वी १४ तारखेला साखळी फेरीत, तर २१ तारखेला सुपर-फोर फेरीत भारताने पाकिस्तानला नमवले. श्रीलंका ६ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोन वेळा जेतेपद मिळवले आहे. त्यांनी २०००मध्ये श्रीलंकेला, तर २०१२मध्ये बांगलादेशला अंतिम फेरीत धूळ चारली होती.