दुबई : ‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लग जाती है...’ एका लोकप्रिय हिंदी चित्रपटातील हा डायलॉग खरा ठरवत रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या शिलेदारांनी रविवारी इतिहास रचला. दुबईच्या रणांगणात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या महाअंतिम मुकाबल्यात भारताने न्यूझीलंडला ४ गडी आणि ६ चेंडू राखून पराभूत केले. याबरोबरच भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्सचा किताब मिळवला. तसेच १२ वर्षांनी ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले. कर्णधार रोहित (८३ चेंडूंत ७६ धावा) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या रोमहर्षक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ७ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र रोहितने साकारलेल्या झुंजार अर्धशतकाला श्रेयस अय्यर (६२ चेंडूंत ४८ धावा), के. एल. राहुल (३३ चेंडूंत नाबाद ३४) यांची उपयुक्त साथ लाभली. त्यामुळे भारताने ४९ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रवींद्र जडेजाने (६ चेंडूंत नाबाद ९ धावा) विल ओरूर्कच्या गोलंदाजीवर चौकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.
सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर पाचव्यांदा चॅम्पियन ट्रॉफीची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाने यापूर्वी २००२ व २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. मुख्य म्हणजे २०१३ प्रमाणेच भारताने यंदाही संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद काबिज केले. २००२मध्ये सौरव गांगुली, तर २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. २०१७ मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता ८ वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय प्रकारातील स्पर्धेत भारताने अजिंक्यपद काबिज केले. रोहितच्या नेतृत्वात भारताचे हे सलग दुसरे आयसीसी जेतेपद ठरले. गतवर्षी जूनमध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. रविवारच्या विजयासह भारताने २०००मध्ये न्यूझीलंडकडूनच अंतिम फेरीत पत्करावा लागलेल्या पराभवाचा वचपा काढला.