शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक

बुधवारच्या या सुवर्ण कामगिरीनंतर भारताने पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
शूटिंग वर्ल्ड कपमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक
Published on

भारताचे मेहुली घोष आणि शाहू तुषार माने यांनी आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कपमध्ये १० मीटर एअर रायफल गटात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. याचबरोबर भारताची दुसरी जोडी पलक आणि शिवा नरवाल यांनी १० मीटर एअर पिस्टलच्या मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

बुधवारच्या या सुवर्ण कामगिरीनंतर भारताने पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पदक तालिकेत सर्बिया दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकून पहिल्या स्थानावर आहे. फॉर्ममध्ये असलेल्या मेहुली आणि शाहू तुषार माने यांनी हंगेरीची जोडी एझ्टर मेसझारोस आणि इस्तवान पेन यांचा १७-१३ असा पराभव केला. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात तिसऱ्या स्थानावर इस्त्रायलची आणि चौथ्या स्थानावर चेक रिपब्लिकची जोडी राहिली. शाहू तुषार मानेचे हे भारताकडून वरिष्ठ स्तरावरील पहिले सुवर्ण पदक ठरले. मेहुलीने आपले दुसरेसुवर्ण पदक पटकाविले. यापूर्वी तिने २०१९ च्या साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.

मिश्र पिस्टल प्रकारात पलक आणि शिवा यांनी एकतर्फी सामन्यात कझाकिस्तानच्या इरिना लोक्तीओनोव्हा आणि वॅलेरिये राखीमझान यांचा १६-० ने पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in