भारताची आशिया चषकातून माघार! ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या फुटबॉल लढतीला प्राधान्य; AIFF चा धक्कादायक निर्णय

पाच वेळच्या जागतिक विजेत्या ब्राझीलविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याला प्राधान्य देण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाने पहिल्यावहिल्या ‘फिफा आसियान कप’ (आशिया चषक) स्पर्धेतून माघार घेतली आहे.
भारताची आशिया चषकातून माघार! ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या फुटबॉल लढतीला प्राधान्य; AIFF चा धक्कादायक निर्णय
भारताची आशिया चषकातून माघार! ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या फुटबॉल लढतीला प्राधान्य; AIFF चा धक्कादायक निर्णय(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : पाच वेळच्या जागतिक विजेत्या ब्राझीलविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याला प्राधान्य देण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाने पहिल्यावहिल्या ‘फिफा आसियान कप’ (आशिया चषक) स्पर्धेतून माघार घेतली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) उपमहासचिव एम. सत्यनारायणन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दोन्ही स्पर्धांच्या तारखांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फिफाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून भारताचा अ-गटात इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरसोबत समावेश करण्यात आला होता. २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मात्र ३ ऑक्टोबर रोजी कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर भारताचा ब्राझीलविरुद्ध सामना निश्चित झाला आहे. एआयएफएफने सुरुवातीला या स्पर्धेसाठी दुसरा किंवा विकास संघ पाठवण्याचा विचार केला होता, परंतु अखेर संपूर्ण स्पर्धेतून माघार घेऊन या कालावधीत मैत्रीपूर्ण सामने खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय २०२६ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या केप व्हर्डे आणि इराणसारख्या संघांविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्याची चाचपणीही भारत करत असल्याचे समजते, मात्र एआयएफएफने याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. २०२७च्या एएफसी आशिया चषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या भारतीय संघाला गेल्या काही वर्षांत मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध नियमित खेळण्याची संधी मिळालेली नाही.

एकूणच भारतीय फुटबॉल सध्या संघर्ष करत असून यामध्ये एआयएफएफच्या भोंगळ कारभाराचेही योगदान आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) बंद पडल्यामुळे भारतातील फुटबॉल पूर्णच ठप्प पडले होते. मात्र आता आयएसएलची गाडी हळूहळू रुळावर येत आहे.

दरम्यान, ४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयएसएलच्या २०२६-२७ हंगामाच्या माध्यम हक्कासाठी १२ ऑगस्टच्या वाढीव मुदतीपर्यंत केवळ एकच बोली प्राप्त झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही एकमेव बोली एका डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने लावली असून त्यांच्याकडे कोणताही टीव्ही चॅनेल नाही. चाहत्यांचा रस टिकवून ठेवण्यासाठी लीनियर टीव्ही प्रसारणाची भूमिका महत्त्वाची असल्याने आता एआयएफएफ आणि आयएसएल क्लब याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. तूर्तास मात्र एआयएफएफच्या निर्णयावर चाहते नाराज असल्याचे समजते.

भारतीय फुटबॉलची सद्यस्थिती

  • भारतीय फुटबॉल संघ सध्या जागतिक फिफा क्रमवारीत १३८व्या स्थानी आहे. सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारताची फुटबॉलमधील कामगिरी आणखी खालावली आहे.

  • भारतीय संघ २०२७च्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरला आहे. तसेच आता फिफाच्या आशिया चषक स्पर्धेतूनही माघार घेत भारताने आशियातील अन्य तुल्यबळ देशांविरोधात खेळण्याची संधी गमावली आहे.

  • गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघ फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी देखील पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे भारताचे पहिला फिफा विश्वचषक खेळण्याचे स्वप्न अद्याप दूरच आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in