भारताकडून झिम्बाब्वेची सफाई; तिसऱ्या सामन्यातील विजयासह महिलांचे मालिकेत ३-० असे निर्भेळ यश

IND W vs ZIM W 3rd ODI : २० वर्षीय डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने (३९ धावांत ५ बळी) कारकीर्दीतील तिसऱ्याच सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली.
भारताकडून झिम्बाब्वेची सफाई; तिसऱ्या सामन्यातील विजयासह महिलांचे मालिकेत ३-० असे निर्भेळ यश
भारताकडून झिम्बाब्वेची सफाई; तिसऱ्या सामन्यातील विजयासह महिलांचे मालिकेत ३-० असे निर्भेळ यश(Photo-X/@BCCIWomen)
Published on: 

वडोदरा : २० वर्षीय डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने (३९ धावांत ५ बळी) कारकीर्दीतील तिसऱ्याच सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली. तिला प्रतिका रावल (५६ चेंडूंत नाबाद ५९ धावा) आणि शफाली वर्मा (२६ चेंडूंत नाबाद ५१ धावा) यांच्या अर्धशतकांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय लढतीत झिम्बाब्वेचा ८ गडी व १९८ चेंडू राखून फडशा पाडला. भारताने एकप्रकारे दिवाळीपूर्वीच झिम्बाब्वेचा सफाया करताना मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने यापूर्वी टी-२० मालिकेतदेखील ३-० असे वर्चस्व गाजवले होते. बुधवारी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर झालेल्या लढतीत झिम्बाब्वेला ३९.५ षटकांत १३१ धावांत गुंडाळल्यावर भारताने १७ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. स्मृती व हरमनप्रीत कौर यांनी फलंदाजीला न येत युवांना संधी दिली. गेल्या लढतीत ४ बळी घेणाऱ्या वैष्णवीने यावेळी पंचक पूर्ण केले. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ३ सामन्यांत १ शतक व २ अर्धशतकांसह २२० धावा करणारी प्रतिका मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. आता नोव्हेंबर महिना भारतीय महिला संघ विश्रांतीवर असेल. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होईल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना वैष्णवीच्या फिरकीसमोर टिकाव धरता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव ३९.५ षटकांत अवघ्या १३१ धावांत गुंडाळला. वैष्णवीने १० षटकांत ३९ धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. तिचा हा केवळ तिसरा एकदिवसीय सामना होता. यापूर्वी दुसऱ्या सामन्यातही तिने चार बळी घेतले होते. झिम्बाब्वेकडून सलामीवीर मॉडेस्टर मुपाचिक्वा हिने ४८ चेंडूंत ३७ धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. वेगवान गोलंदाज सायली सातघरे हिने लॉरीन फिरीला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शफाली वर्माने चिपो मुगेरी-तिरिपानोला झेलबाद केले.

वैष्णवीने बेलव्हड बिझाला बाद केल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मुपाचिक्वाला यष्टिचित केले. फलंदाज पुढे येऊन खेळणार असल्याचा अंदाज घेत तिने चेंडूला अधिक उंची दिली. यष्टिरक्षक यास्तिका भाटियाने संधी साधत मुपाचिक्वाला यष्टिचित केले. वैष्णवीने आपल्या स्पेलच्या अखेरच्या चेंडूवर न्याशा ग्वान्झुराला बाद करत पाच विकेट्स पूर्ण केल्या. क्रांती गौड आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत तिला चांगली साथ दिली.

१३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. यास्तिका भाटिया पहिल्याच चेंडूवर बाद झाली. तर तिसऱ्या क्रमांकावरील हरलीन देओल १९ धावांवर बाद झाली. मात्र, प्रतिकाने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. तिने ५६ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक ठरले. पहिल्या दोन सामन्यांत तिने अनुक्रमे १०० आणि ६१ धावा केल्या होत्या.

तिला साथ देण्यासाठी आलेल्या शफालीने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा ठोकल्या. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली व भारताला केवळ १७ षटकांतच विजय मिळवून दिला. या लढतीसाठी भारताने अंतिम अकरामध्ये तीन बदल केले होते. हरलीन, यास्तिका आणि क्रांती गौड यांना संधी देण्यात आली होती.

दरम्यान, महाराष्ट्राची ३० वर्षीय डावखुरी सलामीवीर व गेल्या अनेक वर्षांपासून उपकर्णधार असलेली स्मृती आधीपासूनच कर्णधारपदासाठी आघाडीची दावेदार होती. हरमनप्रीतला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व पुढेही करायचे होते. मात्र, बोर्डाला तिन्ही प्रकारांत नेतृत्वबदल हवा होता. त्यामुळे स्मृतीकडे धुरा सोपवण्यात आली. स्मृतीच्या नेतृत्वात बंगळुरूने दोन वेळा महिलांच्या डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले आहे.

हे महत्त्वाचे!

  • भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही पहिली द्विपक्षीय महिला एकदिवसीय मालिका होती. याआधी झालेली टी-२० मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली होती. या मालिकेपूर्वी भारतीय महिला क्रिकेटमध्ये नेतृत्वबदल झाला.

  • हरमनप्रीत कौर पायउतार झाल्यावर महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाकडे भारताच्या तिन्ही प्रकारांतील संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आले. स्मृतीपर्वाला एकूणच दमदार सुरुवात झाली.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे : ३९.५ षटकांत सर्व बाद १३१ (मुपाचिक्वा ३७; वैष्णवी शर्मा ५/३९) पराभूत वि.

भारत : १७ षटकांत २ बाद १३३ (प्रतिका रावल नाबाद ५९, शफाली वर्मा नाबाद ५१)

सामनावीर : वैष्णवी शर्मा

मालिकावीर : प्रतिका रावल

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in