भारतीय महिला संघ विश्वचषकातून बाहेर; मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला एकीकडे रविवारी टी-२० विश्वचषकातून गारद व्हावे लागले. मात्र सोमवारी त्यांनी २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवली.
भारतीय महिला संघ विश्वचषकातून बाहेर; मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र
भारतीय महिला संघ विश्वचषकातून बाहेर; मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र
Published on

नवी दिल्ली : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला एकीकडे रविवारी टी-२० विश्वचषकातून गारद व्हावे लागले. मात्र सोमवारी त्यांनी २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवली. लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होणार असून यंदाच्या टी-२० विश्वचषकात आशिया खंडातील सर्वोत्तम देश म्हणून भारतीय महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी ही पात्रता प्रक्रिया जाहीर करण्यात आली. तब्बल एका शतकानंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत असून पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी अवघ्या ६ संघांचा समावेश असेल. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमध्ये ओशनिया, युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च मानांकित संघ म्हणून अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांनी ६ संघांच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. एकदिवसीय विश्वविजेत्या भारतीय संघाने टी-२० विश्वचषकातील मोहीम अपेक्षेपेक्षा लवकर संपूनही आशिया खंडाचा कोटा मिळवला आहे. रविवारी झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान हुकले होते.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणे वेस्ट इंडिजनेही महिला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, वेस्ट इंडिज हा अनेक कॅरिबियन देशांचे प्रतिनिधित्व करणारा संयुक्त 'आयसीसी' सदस्य आहे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा (आयओसी) स्वतंत्र राष्ट्रीय ऑलिम्पिक संघ (एनओसी) म्हणून त्याला मान्यता नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज ऑलिम्पिक खेळांमध्ये एक संघ म्हणून थेट भाग घेण्यास किंवा कोटा मिळवण्यास पात्र नाही.

“१०० वर्षांनंतर खेळाचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत असताना पात्रता मार्ग जाहीर होणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,” असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले. ऑलिम्पिक खेळ हे क्रीडा जगताचे सर्वोच्च शिखर असून क्रिकेटच्या समावेशामुळे प्रत्येक भागातील खेळाडू आणि चाहत्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता क्रिकेटच्या पुनरागमनाकडे लक्ष लागून आहे.

पुरुष संघाचे काय?

* भारतीय पुरुष संघाला ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळवण्यासाठी या वर्षाच्या शेवटी जागतिक क्रमवारीत आशिया खंडात अव्वल स्थानी राहावे लागणार आहे.

* पुरुष संघांसाठी पात्रता प्रक्रिया क्रमवारीवर अवलंबून असून विविध खंडांमधून चार सुरुवातीचे कोटा स्लॉट दिले जातील. ‘आयसीसी’ पुरुष टी-२० संघ क्रमवारीतून वेगवेगळ्या खंडांमधील सर्वोच्च रँकिंग असलेल्या पात्र देशांना हे स्थान दिले जाईल. यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

* यजमान देश अमेरिकेला पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी एक कोटा जागा निश्चित मिळाली आहे, कारण त्यांनी पात्रता कालावधीत १५ किंवा त्यापेक्षा चांगली रँकिंग राखण्याचा आयसीसीचा निकष पूर्ण केला आहे.

* याशिवाय दोन्ही गटांसाठी अंतिम ऑलिम्पिक जागतिक पात्रता स्पर्धा स्वतंत्रपणे घेतली जाईल, ज्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. त्यामुळे पुरुषांच्या विभागात चुरस पाहायला मिळणार आहे.

रणनीती बदलण्यासह कठोर निर्णय घेण्याची गरज : मुझुमदार

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी-२० विश्वचषकातील आव्हान गट साखळीतच संपुष्टात आल्यानंतर मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी संघाला या प्रकारात आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करावा लागेल व काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी कबुली दिली आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी विजय आवश्यक असताना भारतीय संघाला ६ वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७० धावांच्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. यामुळे सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाला साखळी स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले, असे मुझुमदार यांनी पराभवानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

“भारताने स्पर्धेत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सविरुद्ध सोपे विजय मिळवले असले तरी, उपांत्य फेरीचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे संघातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. जर मला संपूर्ण स्पर्धेतील काही ठराविक गोष्टींवर बोट ठेवायचे असेल, तर आपल्याला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा गांभीर्याने विचार करावा लागेल,” असे ते म्हणाले.

फलंदाजीतही थोडे आक्रमक होण्याची गरज असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ ते २० धावा अधिक असत्या तर त्याचा फायदा झाला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. खेळपट्टीच्या मानाने भारताची धावसंख्या स्पर्धात्मक होती, परंतु त्या दिवशी ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा सरस संघ होता, अशी कबुली मुझुमदार यांनी दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in