

लंडन : टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी विसरून भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या ऐतिहासिक पहिल्या महिला कसोटी सामन्यात विजयाचे नवे पान लिहिण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर १४२ वर्षांपूर्वी पहिला पुरुष कसोटी सामना खेळवला गेला होता, ज्यानंतर आता पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना येथे रंगणार आहे.
विश्वचषकातून लवकर बाहेर पडावे लागल्यामुळे भारतीय संघाला या लाल चेंडूच्या सामन्यासाठी पूर्वतयारीला अधिक वेळ मिळाला. भारतीय संघाने या सामन्याच्या तयारीसाठी वर्म्सले क्रिकेट मैदानावर कसून सराव केला असून या वर्षातील भारताचा हा दुसरा कसोटी सामना आहे. या ऐतिहासिक कसोटी सामन्यात खेळण्याच्या कल्पनेनेच खेळाडू कमालीचे उत्सुक असल्याचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सांगितले. लॉर्ड्स मैदानावर कसोटी खेळणे हे कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि शुक्रवारी पांढरा पोशाख परिधान करून मैदानात उतरणारा प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सामन्यात भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा सलामीला येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या प्रतिका रावल हिच्या दुखापतीमुळे संघात प्रिया पुनियाचा समावेश करण्यात आला आहे. महिला क्रिकेटमध्ये कसोटी सामने खूप कमी होत असले तरी इंग्लंडविरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारताने इंग्लंडविरुद्धच्या मागील चारपैकी तीन सामने जिंकले असून इंग्लंडच्या भूमीवर भारताने अद्याप एकही कसोटी गमावलेली नाही. भारताकडून हरलीन देओल, फिरकीपटू श्री चरणी आणि वेगवान गोलंदाज नंदनी शर्मा पदार्पण करू शकतात. तर इंग्लंड संघात ॲलिस कॅप्सी, टिली कोर्टीन-कोलमन, मॅडी विलिअर्स, ग्रेस पॉट्स हे पाच खेळाडू पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, इंग्लंडची अनुभवी सलामीवीर टॅमी ब्युमाँट या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतके झळकावणारी ती इंग्लंडची केवळ दुसरी महिला खेळाडू असून लॉर्ड्सवरील ही ऐतिहासिक कसोटी कारकिर्दीचा निरोप घेण्यासाठी परिपूर्ण प्रसंग असल्याचे तिने नमूद केले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा ऐतिहासिक सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, नुकताच झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून भारतीय संघ पराभूत झाला. आता कसोटीत ते कशी कामगिरी करणार, याकडे लक्ष असेल.
भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, क्रांती गौड, रिचा घोष, प्रिया पुनिया, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, सायली सातघरे, नंदिनी शर्मी, दीप्ती शर्मा, श्री चरणी.
वेळ : दुपारी ३.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी