
मुंबई : अनुभवी मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याने आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघात परतली आहे. मात्र युवा सलामीवीर शफाली वर्माचा या स्पर्धेसाठी विचार करण्यात आलेला नाही. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठीही यावेळी संघ जाहीर करण्यात आला.
भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे (५० षटकांचा) आयोजन करणार आहेत. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. मात्र यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे. या विश्वचषकासाठी मंगळवारी मुंबईत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी हरमनप्रीतसह निवड समिती अध्यक्ष नितू डेव्हिड उपस्थित होत्या. भारतीय संघ १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान, २१ वर्षीय शफाली ऑक्टोबर २०२४मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळली आहे. २९ सामन्यांत तिला फक्त ४ अर्धशतकेच झळकावता आली आहेत. त्यामुळे भारताने गतवर्षीपासून स्मृती मानधनाच्या साथीने प्रतिका रावलला सलामीला संधी दिली. २४ वर्षीय प्रतिकाने १४ सामन्यांतच ५४च्या सरासरीने ७०३ धावा केल्या असून यामध्ये १ शतक व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील कामगिरी व भारत-अ संघाकडून चांगला खेळ केल्यानंतर शफालीचे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन होणार, असे वाटले होते. मात्र संघ व्यवस्थापनाने प्रतिकावरच विश्वास दर्शवला आहे.
तसेच रेणुका ही मार्च स्नायूंच्या महिन्यापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होती. मात्र आता ती वेळेत तंदुरुस्त झाल्याने भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहील. तसेच अष्टपैलू अमनजोत कौर ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग नसली, तरी तिला विश्वचषकासाठी स्थान देण्यात आले आहे. तोपर्यंत अमनजोत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीवर भर देणार आहे.
एकंदर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम स्पष्ट असून स्मृती, प्रतिकानंतर अनुक्रमे हरलीन देओल, जेमिमा, हरमनप्रीत, रिचा घोष फलंदाजीस येतील. त्याशिवाय फिरकी विभागात भारताकडे दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी व स्नेह राणा असे चार पर्याय आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत छाप पाडणारी क्रांती गौड व अरुंधती रेड्डी रेणुकाला वेगवान विभागात साथ देतील. यास्तिका भाटिया पर्यायी यष्टिरक्षक म्हणून संघात असून गरज पडल्यास ती सलामीलासुद्धा फलंदाजी करू शकते. एकंदर संघ कागदावर समतोल आहे.
विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रिचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, रेणुका ठाकूर, श्री चरणी, स्नेह राणा. राखीव तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा, उमा छेत्री, मिन्नू मणी, सायली सतघरे.