महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर

विक्रमी आठव्यांदा टी-२० आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
हरमनप्रीत कौर (संग्रहित छायाचित्र)
हरमनप्रीत कौर (संग्रहित छायाचित्र)छाया सौ - एक्स (@BCCIWomen)
Published on

नागोया (जपान) : विक्रमी आठव्यांदा टी-२० आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आता आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचेच पारडे जड मानले जात आहे.

या महिला स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून थेट उपांत्यपूर्व फेरीपासूनच सामने खेळवले जात आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी भारत व श्रीलंका आगेकूच करतील, अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेसमोर मलेशियाचे आव्हान असेल. गट फेरीचे सामने नसल्यामुळे संघांना लय गवसण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही. एका पराभवामुळे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

भारतीय फलंदाजीत धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा मुख्य शस्त्र ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात तिने सर्वाधिक धावा करत शानदार कामगिरी केली होती. उपकर्णधार स्मृती मानधना या स्पर्धेत आपली लय परत मिळवण्यासाठी उत्सुक असेल. हरमनप्रीतकडून मोठ्या अपेक्षा असतील. मधल्या फळीत यष्टीरक्षक रिचा घोष संघाला मजबूती प्रदान करेल.

गोलंदाजीत अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि डावखुरी फिरकीपटू श्री चरणी यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल. अवघ्या ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ५० बळींचा टप्पा गाठणाऱ्या २२ वर्षीय श्री चरणीची मधल्या षटकांत धावगती रोखण्याची क्षमता निर्णायक ठरू शकते. वेगवान गोलंदाजीत नंदिनी शर्मा, रेणुका ठाकूर आणि क्रांती गौड हे पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे यजमान जपानचा संघ मायदेशातील वातावरणाचा फायदा उठवत भारताला आव्हान देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

वेळ : सकाळी १०.३० वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, टेन ३

बांगलादेश, पाकिस्तान उपांत्य फेरीत

* बांगलादेशच्या महिला संघाने मैदानात न उतरताच आशियाई क्रीडा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला मात्र उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी थायलंडविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या अटीतटीच्या सामन्यात मोठा संघर्ष करावा लागला.

* आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या बांगलादेश आणि ३६व्या स्थानावरील चीन यांच्यातील उपांत्यपूर्व सामना पाऊस तसेच मैदानातील ओलाव्यामुळे रद्द करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत वरच्या स्थानावर असल्याच्या आधारावर बांगलादेशने थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशची २० सप्टेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि जपान यांच्यातील विजेत्या संघाशी गाठ पडेल.

* दुसरीकडे ओल्या मैदानामुळे उशिरा सुरू झालेला पाकिस्तान आणि थायलंड यांच्यातील सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडने ४ गडी गमावून ९१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या फलंदाजांनी सातत्याने गडी गमावले. शवाल जुल्फिकारच्या २५ आणि फातिमा सनाने केलेल्या २१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने तीन गडी राखून शेवटच्या षटकात विजय मिळवला. पाकिस्तानची आता श्रीलंका आणि मलेशिया यांच्यातील विजेत्या संघाशी उपांत्य फेरीत गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in