अखेर भारतीय महिला उपांत्य फेरीसाठी पात्र; भाऊबीजच्या मुहूर्तावर न्यूझीलंडवर ५३ धावांनी दमदार विजय

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने अखेर एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
अखेर भारतीय महिला उपांत्य फेरीसाठी पात्र; भाऊबीजच्या मुहूर्तावर न्यूझीलंडवर ५३ धावांनी दमदार विजय
Photo : X (@cricketworldcup)
Published on

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने अखेर एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. गुरुवारी झालेल्या सहाव्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. सलग तीन पराभवांनंतर भारत विजयपथावर परतला, हे विशेष.

भाऊबीजच्या मुहूर्तावर डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९ षटकांत ३ बाद ३४० धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधना (९५ चेंडूंत १०९ धावा) आणि प्रतिका रावल (१३४ चेंडूंत १२२ धावा) या सलामीवीरांनी शतके झळकावली. पावसामुळे अर्धा तास वाया गेल्यामुळे न्यूझीलंडसमोर ४४ षटकांत ३२५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र त्यांना ८ बाद २७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. क्रांती गौड व रेणुका सिंग या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. त्यामुळे भारताने सहा सामन्यांतील तिसरा विजय नोंदवून उपांत्य फेरीतील चौथे आणि अखेरचे स्थान पक्के केले. स्मृतीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

तूर्तास, ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत ११ गुणांसह अग्रस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका (१०) व इंग्लंड (९) यांनीसुद्धा उपांत्य फेरी गाठलेली आहे. भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असून रविवारी त्यांची शेवटच्या साखळी लढतीत बांगलादेशशी गाठ पडणार आहे. श्रीलंका (५), न्यूझीलंड (४), पाकिस्तान (३) व बांगलादेश (२) यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. २९ तारखेपासून उपांत्य फेरीला प्रारंभ होणार असून अनुक्रमे गुवाहाटी व नवी मुंबई येथे या लढती होतील. मग २ नोव्हेंबरला नवी मुंबईतच अंतिम सामना रंगणार आहे.

भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगत असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत झाल्या. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले असून भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती.

दरम्यान, भारताने या स्पर्धेत श्रीलंका व पाकिस्तान यांना नमवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन बलाढ्य संघांकडून भारताला पराभव पत्करावा लागला. त्यातही आफ्रिका व इंग्लंडविरुद्धचा पराभव अधिक जिव्हारी लागणारा ठरला, कारण एकवेळ भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. त्यामुळे चाहत्यांकडून होणारी टीका व अपेक्षांचे दडपण झेलून भारतीय संघाने डी. वाय. पाटीलमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी केली. आता उपांत्य फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असू शकते.

logo
marathi.freepressjournal.in