नवी मुंबई : महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची रविवारी अखेरच्या साखळी लढतीत बांगलादेशशी गाठ पडणार आहे. भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले असले, तरी त्यापूर्वी त्यांना प्रयोग करण्याची अखेरची संधी मिळणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ही लढत होईल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वीच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के करताना न्यूझीलंडला ५३ धावांनी पराभूत केले. सलग तीन पराभवांनंतर भारताने तो विजय नोंदवला. सध्या भारतीय संघ ६ सामन्यांतील ३ विजयांच्या ६ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले आहे.
ऑस्ट्रेलियाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. त्यामुळे त्यांनी ७सामन्यांतील ६ विजय व १ रद्द लढत असे एकूण १३ गुण मिळवत अग्रस्थान पटकावले. आफ्रिका (१०) व इंग्लंड (९) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २९ ऑक्टोबरपासून उपांत्य फेरीला प्रारंभ होणार असून अनुक्रमे गुवाहाटी व नवी मुंबई येथे या लढती होतील. बुधवारी इंग्लंड व आफ्रिका आमनेसामने येतील, मग गुरुवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. २ नोव्हेंबरला नवी मुंबईतच अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दरम्यान, भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगत असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत झाले. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत झाल्या. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले असून भारताने २००५ व २०१७या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती.
भारताने या स्पर्धेत श्रीलंका व पाकिस्तान यांना नमवून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन बलाढ्य संघांकडून भारताला पराभव पत्करावा लागला. त्यातही आफ्रिका व इंग्लंडविरुद्धचा पराभव अधिक जिव्हारी लागणारा ठरला, कारण एकवेळ भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. त्यामुळे चाहत्यांकडून होणारी टीका व अपेक्षांचे दडपण झेलून भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी केली.
आता रविवारी भारतीय संघ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो. कारण गुरुवारी भारताला निर्णायक उपांत्य लढत खेळायची आहे. भारताला उर्वरित सर्व सामने नवी मुंबईतच खेळायचे असल्याने त्यांच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरू शकते. स्मृती मानधना, प्रतिका रावल, जेमिमा रॉड्रिग्ज व हरमनप्रीत यांनी भारतासाठी फलंदाजीत छाप पाडली आहे. गोलंदाजीत फिरकीपटू दीप्ती शर्मा, रेणुका सिंग व क्रांती गौड या वेगवान जोडीवर भिस्त आहे.
उपांत्य फेरीचे सामने
बुधवार, २९ ऑक्टोबर : इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
गुरुवार, ३० ऑक्टोबर : भारत वि. ऑस्ट्रेलिया
रविवार, २ नोव्हेंबर : अंतिम सामना (नवी मुंबई)