नवी दिल्ली : गुनालन कमलिनी आणि वैष्णवी शर्मा यांचा भारताच्या टी-२० महिला संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध रंगणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात २ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ सध्या विश्रांतीवर आहे. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.
आता महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळणार आहे. श्रीलंका महिला संघ डिसेंबरच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये ५ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत हे पाच सामने होतील. २१ व २३ तारखेला विशाखापट्टणम येथे, तर २६, २८ व ३० डिसेंबरच्या लढती तिरुवनंतपुरम येथे होतील. त्यानंतर ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. मग भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल. त्यामध्ये ३ टी-२०, ३ एकदिवसीय व १ कसोटी सामन्याचा समावेश आहे.
दरम्यान, विश्वचषकाचा भाग असलेल्या उमा छेत्री, राधा यादव यांना टी-२० संघात स्थान लाभलेले नाही. तसेच यास्तिका भाटियासुद्धा अद्याप दुखापतीतून सावरलेली नाही. १७ वर्षीय कमलिनी आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळते, तर वैष्णवीला मात्र लिलावात कोणीही खरेदी केले नाही. पुढील वर्षी महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे आता महिला संघाचे लक्ष टी-२० सामन्यांवर अधिक असेल.
दरम्यान, भारतीय महिला संघासाठी लकी ठरलेल्या नवी मुंबईतील ऐतिहासिक डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. यंदा प्रथमच अंतिम सामना आठवड्याच्या अखेरीस न ठेवता मधल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेच्या दोन दिवसांनंतर लगेच ७ फेब्रुवारीपासून पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल.
भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग, रिचा घोष, गुनालन कमलिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.