

नवी दिल्ली: दुखापतीमधून सावरलेली जेमिमा रॉड्रिग्ज हिचे भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन झाले असून आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तिला तिन्ही संघांत स्थान लाभले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचे तीन संघ जाहीर करताना प्रामुख्याने जुन्या चेहऱ्यांवरच विश्वास दर्शवला. अमनजोत कौरही टी-२० संघात परतली आहे. मात्र फिरकीपटू श्रेयांका पाटीलला अनपेक्षितपणे डच्चू देण्यात आला आहे.
आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात ९ डिसेंबरपासून रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याद्वारे होईल. त्यानंतर १६ ते २२ डिसेंबर दरम्यान पार्ल, केपटाऊन आणि ब्लोमफॉन्टेन येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. २५ ते ३० डिसेंबर दरम्यान बेनोनी आणि पाँचेफस्ट्रम येथे ३ टी-२० सामने पार पडतील. माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिचाही तिन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, २६ वर्षीय फलंदाज जेमिमाला इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' स्पर्धेदरम्यान स्नायूंची दुखापत झाली होती. त्यामुळे ती आशिया चषक, आशियाई क्रीडा स्पर्धा व झिम्बाब्वेविरुद्ध नुकताच झालेल्या मालिकेस मुकली होती. आता जेमिमा संघात परतल्याने भारताची मधली फळी भक्कम होईल. टी-२० संघात मात्र जेमिमाच्या जागी शफाली वर्माकडे उपकर्णधारपद कायम राखण्यात आले आहे. एकदिवसीय व कसोटी प्रकारात दीप्ती शर्मा उपकर्णधार असेल.
तसेच २६ वर्षीय अष्टपैलू अमनजोत दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होती. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून खेळल्यानंतर ती मैदानात उतरलेली नव्हती. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तिचे पुनरागमन होत आहे. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणि तिच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून निवड समितीने तिला केवळ टी-२० संघात स्थान दिले आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या जिंतामणी कलिताला टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. मात्र, एकदिवसीय संघासह तिला एकमेव कसोटीसाठीही संधी देण्यात आली आहे. श्रेयांकाला टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. दीप्ती शर्मा, श्री चरणी, प्रेमा रावत या फिरकी पर्यायांचा संघात समावेश असल्याने श्रेयांकासाठी जागा उपलब्ध नसल्याचे समजते.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचे संघ
कसोटी: स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, स्नेह राणा, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, जिंतामणी कलिता, सायली सातघरे.
एकदिवसीय : स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, जिंतामणी कलिता, सायली सातघरे.
टी-२० : स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष, गुणालन कमलिनी, अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, श्री चरणी, अमनजोत कौर, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, सायली सातघरे.
वेळापत्रक
९ डिसेंबर सामना, ग्वेबेर्हा एकमेव कसोटी
१६ डिसेंबर : पहिली एकदिवसीय लढत, पार्ल
१९ डिसेंबर लढत, केप टाऊन दुसरी एकदिवसीय
२२ डिसेंबर : तिसरी एकदिवसीय लढत, ब्लूमफॉन्टेन
२६ डिसेंबर: पहिला टी-२० सामना, बेनोनी
२९ डिसेंबर दुसरा टी-२० सामना, पाँचफस्ट्रम
३० डिसेंबर तिसरा टी-२० सामना, पचिफस्ट्रम