आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व गाजवण्याचे उद्दिष्ट! भारतीय महिलांचा आज साऊथहॅम्पटन येथे इंग्लंडशी पहिला सामना

टी-२० मालिकेत यश संपादन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्यास भारतीय महिला संघ उत्सुक आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व गाजवण्याचे उद्दिष्ट! भारतीय महिलांचा आज साऊथहॅम्पटन येथे इंग्लंडशी पहिला सामना
Published on

साऊथहॅम्पटन : टी-२० मालिकेत यश संपादन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्यास भारतीय महिला संघ उत्सुक आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

यंदा सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघ संघबांधणी करत आहे. मे महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह झालेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताने सहज जेतेपद पटकावले. मुख्य म्हणजे त्या मालिकेत भारताने ३ वेळा ३००हून अधिक धावसंख्या उभारली. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धही भारतीय संघ हाच पवित्रा कायम राखणार का, हे पाहणे रंजक ठरेल. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषकाला प्रारंभ होणार असल्याने भारतीय महिलांकडे आता संघबांधणी करण्यासाठी फार कमी अवधी आहे.

“गेल्या १-२ वर्षांपासून आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००हून अधिक धावा करण्यावर भर दिला आहे. यामुळे गोलंदाजांनाही दडपणमुक्त मारा करता येतो. जेव्हा आम्ही प्रथम फलंदाजी करतो, तेव्हा प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या धावसंख्येचे दडपण आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आता इंग्लंडमध्येही खेळपट्ट्यांचा आढावा घेत आम्ही रणनिती आखू,” असे कर्णधार हरमनप्रीत सामन्यापूर्वी म्हणाली.

दरम्यान, हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारताने नुकताच इंग्लंडमध्ये प्रथमच टी-२० मालिका जिंकली. तर २०२२मध्ये भारताने आधीच इंग्लंडला एकदिवसीय मालिकेतही पराभूत केले होते. भारतीय संघाची फलंदाजीत प्रतिका रावल, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर भिस्त आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग, तिथास साधू व पूजा वस्त्रकार मात्र दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नाहीत. त्यामुळे फिरकीपटूंवर भारताच्या गोलंदाजीची मदार आहे.

दुसरीकडे कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट दुखापतीतून सावरत संघात परतल्याने इंग्लंडची चिंता कमी झाली आहे. डावखुरी फिरकीपटू सोफी एक्केलस्टोनचेही पुनरागमन झाले आहे. टॅमी ब्युमाँट, सोफीया डंकली या खेळाडूंकडून इंग्लंडला दमदार कामगिरी अपेक्षित आहे.

दोन सराव सामने

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. मंगळवारी आयसीसीने सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. भारतीय संघ २५ सप्टेंबरला इंग्लंडशी, तर २७ तारखेला न्यूझीलंडशी सराव सामना खेळेल. ३० सप्टेंबरपासून विश्वचषक सुरू होईल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरिणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.

इंग्लंड : नॅट शीव्हर ब्रंट (कर्णधार), एम अर्लोट, टॅमी ब्युमाँट, लॉरेन बेल, एलिस कॅप्सी, केट क्रॉस, एलिस रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी एक्केलस्टोन, लॉरेन फिलर, एमी जोम्स, एमा लम्ब, लिन्से स्मिथ, मिया बुचर.

वेळ : सायंकाळी ५.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in