
राजकोट : अनुभवी आणि डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना भारतीय महिला संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज आहे. तिच्या नेतृत्वात आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. भारत-आयर्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून राजकोट येथे प्रारंभ होईल.
नियमित कर्णधार हरमनप्रीत आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंग यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे स्मृती भारताचे नेतृत्व करणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्यामुळे उपलब्ध सामन्यांत योग्य त्या खेळाडूंची निवड करण्याचे आव्हान भारतापुढे आहे. १०, १२ व १५ जानेवारी या तारखांना भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजता सामन्यांना सुरुवात होईल. आयर्लंडचा संघ प्रथमच भारत दौऱ्यावर आला आहे. त्यांचे नेतृत्व गॅबी लेविस करणार असून विश्वचषकाच्या पात्रतेसाठी ही मालिका जिंकणे त्यांना अत्यंत गरजेचे आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा पराभव पत्करल्यानंतर भारताने मायदेशात वेस्ट इंडिजला धूळ चारली. त्यांनी टी-२० मालिकेत २-१ असे, तर एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश मिळवले. या मालिकांमध्ये हरमनप्रीत व रेणुका यांनी चांगली कामगिरी केली. तूर्तास त्यांना विश्रांती देण्यात आली असून मुंबईची सायली सतघरे व राघवी बिश्त यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, शफाली वर्मा, राधा यादव यांना या मालिकेसाठीही वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिका रावलच स्मृतीच्या साथीने सलामीला येईल. तसेच जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, हरलीन देओल हे फलंदाज संघात कायम आहेत. गोलंदाजीत साइमा ठाकोर व तिथास साधू वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. फिरकीच्या विभागात भारताकडे असंख्य पर्याय आहेत.
या मालिकेनंतर फेब्रुवारीत महिलांची आयपीएल होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जूनमध्ये ५ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
भारताचा संघ
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री, रिचा घोष, तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा, तिथास साधू, साइमा ठाकोर, सायली सतघरे
सामन्याची वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप