

दुबई : 'टी-२० महिला आशिया चषक' स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रविवारी भारतीय महिला संघ थायलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत आपल्या सातत्य आणि फॉर्मबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधत पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या दशकभरात भारतीय महिला संघाने आशिया चषकात वर्चस्व राखले असून २०१६-१७ पासून पार पडलेल्या पाच मोसमांपैकी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, सध्या संघाची कामगिरी आश्वासक वाटत नसून चिंता वाढवणारी ठरत आहे.
चालू वर्षात भारताने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ९ सामने गमावले आहेत. 'टी-२० महिला विश्वचषक' स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पराभव भारताला साखळी फेरीतच बाहेर काढण्यास कारणीभूत ठरला होता.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फॉर्म आणि टी-२० क्रिकेटमधील भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, भारतीय संघ महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.
आठ संघांच्या या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तानसोबत करण्यात आला आहे. या स्पर्धेनंतर जपानमध्ये होणाऱ्या 'आशियाई क्रीडा' स्पर्धेत भारताला सहभाग घ्यायचा आहे. अनुभवी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज दुखापतीमुळे आशिया चषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडल्याने तिच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश केला आहे.
सलामीला स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची जोडी कायम असेल, मात्र तिसऱ्या आणि त्यानंतरच्या क्रमांकावरील फलंदाजांसमोर धावांचा वेग कायम ठेवण्याचे आव्हान असेल.
गोलंदाजीत दीप्ती शर्मा फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल, तर श्री चरणी, राधा यादव आणि प्रेमा रावत तिला साथ देतील. वेगवान गोलंदाजीत रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी आणि नंदानी शर्मा यांच्यावर जबाबदारी असेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, भारती फुलमाळी, रिचा घोष, गुनानन कामिनी, प्रतिका। रावल, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूप, नंदनी शर्मा, श्री चरिणी, राधा यादव.
थायलंड : नरूमोल चायवाय (कर्णधार), नन्नाफट चायहान, नथ्थाकन चंथम, नाओमी हिल्टन, नन्नापट कोंचारोएंकाय, ओनिचा कामचोम्फू, फन्नीता माया, चनिदा सुथीरुआंग, अफिसारा सुवानचोराथी, सुनिदा चथुओंगरत्ना, चायानिसा फेंगपेन, सुलीपोर्न लाओमी, थिपात्वा पुथ्थावाँग, थनरदा सीसावान, कोरानिट सुवानचोप्राथी.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता