

वडोदरा : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या ऐतिहासिक महिला एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने पहिल्या दोन सामन्यांत शानदार विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याआधी या महिन्यात भारताने टी-२० मालिकेतही झिम्बाब्वेचा ३-० असा धुव्वा उडवला होता.
पहिल्या लढतीत सलामीवीर प्रतिका रावलच्या नाबाद शतकाच्या आणि युवा फिरकीपटू श्री चरणीच्या चार बळींच्या जोरावर भारताने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रतिकाने नाबाद १०० धावा केल्या, तर चरणीने प्रभावी गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
दुसऱ्या सामन्यात अनुभवी हरमनप्रीत कौरने १२६ धावांची शानदार खेळी केली, तर दीप्ती शर्माने नाबाद १०६ धावा ठोकल्या. या दोघींच्या शतकांच्या जोरावर भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात ३२८ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर युवा डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला २०७ धावांत गुंडाळले. भारताने हा सामना १२१ धावांनी जिंकत मालिकाही खिशात घातली.
पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्मृती मानधनाने चांगली सुरुवात केली आहे. मात्र, मालिकेची सांगता करण्यापूर्वी तिला मोठी खेळी करण्याची संधी साधायची असेल. पहिल्या सामन्यात तिने ३२ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तिला खातेही उघडता आले नाही.
दुसरीकडे, प्रतिका रावलने पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात ६१ धावा करत सलामीवीर म्हणून आपली दावेदारी भक्कम केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शेफाली वर्मानेही नव्या भूमिकेत प्रभावी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात तिने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद ६४ धावा ठोकल्या. हरमनप्रीत कौरचे फॉर्ममध्ये पुनरागमन हा भारतीय संघासाठी मालिकेतील सर्वांत मोठा सकारात्मक मुद्दा ठरला आहे. दुसऱ्या वनडेत तिने आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा सुरेख मिलाफ साधत शतक झळकावले.
गोलंदाजी विभागानेही आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात श्री चरणीने २३ धावांत चार बळी घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. दुसऱ्या सामन्यात वैष्णवी शर्माने चार बळी मिळवले, तर दीप्ती शर्माने तीन फलंदाजांना माघारी धाडले.
पाहुण्यांसमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान
झिम्बाब्वेसाठी तिसरा सामना हा मालिकेत दमदार प्रतिकार करण्याची अखेरची संधी असेल. भारतीय गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांना मोठ्या भागीदाऱ्या उभारण्यात अपयश आले आहे. तसेच भारताच्या मजबूत फलंदाजी फळीला रोखण्याचे आव्हान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर असेल.
वेळ : दुपारी २ वाजता ; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २