चेस्टर ली स्ट्रीट : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (८४ चेंडूंत १०२ धावा) शतकाला उदयोन्मुख वेगवान गोलंदाज क्रांती गौडच्या (५२ धावांत ६ बळी) भेदक माऱ्याची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर १३ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय महिलांनी एकदिवसीय मालिकेत २-१ असे यश संपादन केले. विशेष म्हणजे भारतीय महिलांनी प्रथमच इंग्लंड दौऱ्यात टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही जिंकण्याची पराक्रम केला.
रिव्हरसाईड ग्राऊंडवर झालेल्या या निर्णायक लढतीपूर्वी दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र भारताने उभारलेल्या ३१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४९.५ षटकांत ३०५ धावांत गारद झाला. इंग्लंडची कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट (९८) व एमा लम्ब (६८) यांची झुंज व्यर्थ ठरली. २१ वर्षीय क्रांतीने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. हरमनप्रीत सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच ३ सामन्यांत सर्वाधिक १२६ धावा केल्यामुळे तिलाच मालिकावीर पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले. हरमनप्रीतने मात्र मोठ्या मनाने आपला पुरस्कार क्रांतीला दिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने आक्रमणावर भर दिला. प्रतिका रावल (२६) व स्मृती मानधना (४५) यांनी १२ षटकांत ६४ धावांची सलामी नोंदवली. चार्ली डीनने प्रतिकाला, तर सोफी एक्केलस्टोनने स्मृतीला माघारी पाठवले. मग २ बाद ८१ वरून हरमनप्रीत आणि हरलीन देओल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भर घातली. हरलीनलासुद्धा (४५) अर्धशतकाने हुलकावणी दिली. हरमनप्रीतने मात्र १४ चौकारांसह इंग्लंडविरुद्धचे तिसरे, तर एकंदर आठवे शतक साकारले. तिला मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जची सुरेख साथ लाभली. जेमिमाने ७ चौकारांसह ४५ चेंडूंत ५० धावा केल्या. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीत व जेमिमा बाद झाल्यावर रिचा घोषने १८ चेंडूंतच नाबाद ३८ धावा फटकावून भारताला ५० षटकांत ३१८ धावांपर्यंत नेले.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना क्रांतीने तिसऱ्याच षटकात एमी जोन्स (४) व टॅमी ब्युमाँटला (२) माघारी पाठवून इंग्लंडची २ बाद ८ अशी अवस्था केली. मात्र ब्रंट आणि लम्ब यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी रचून सामन्यात रंगत निर्माण केली. फिरकीपटू श्री चरिणीने लम्बला बाद करून ही जोडी फोडली, तर दीप्ती शर्माने ब्रंटला शतक साकारण्यापासून रोखले. मग क्रांतीने पुन्हा हंगामा केला. अखेरीस क्रांतीनेच ५०व्या षटकात लॉरेन बेलची विकेट मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ५ बाद ३१८ (हरमनप्रीत कौर १०२, जेमिमा रॉड्रिग्ज ५०, स्मृती मानधना ४५; सोफी एक्केलस्टोन १/२८) विजयी वि.
इंग्लंड : ४९.५ षटकांत सर्व बाद ३०५ (नॅट शीव्हर ब्रंट ९८, एमा लम्ब ६८; क्रांती गौड ६/५२, श्री चरिणी २/६८)
सामनावीर आणि मालिकावीर : हरमनप्रीत कौर