

वडोदरा : डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने (२३ धावांत ४ बळी) कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. तिला प्रतिका रावलच्या (९६ चेंडूंत नाबाद १०० धावा) शतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ९ गडी व १३७ चेंडू राखून सहज फडशा पाडला.
वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर झालेल्या लढतीत झिम्बाब्वेला १९७ धावांत गुंडाळल्यावर भारताने २७.१ षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात विजय मिळवला. प्रतिकाने १५ चौकारांसह कारकीर्दीतील तिसरे शतक साकारले. तिला शफाली वर्माने ३३ चेंडूंतच नाबाद ६४ धावा फटकावून उत्तम साथ दिली. कर्णधार स्मृती मानधनाने ३२ धावांचे योगदान देताना प्रतिकासह ९४ धावांची सलामी नोंदवली. मग प्रतिका व शफालीच्या जोडीने १०६ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. प्रतिकाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याबरोबरच भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरी लढत रविवार, २५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येईल.
दरम्यान, टी-२० मालिकेत ३-० असे दणदणीत यश मिळवल्यानंतर नवी कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. या लढतीत भारताकडून जिंतामणी कलिताने पदार्पण केले. रेणुका सिंग दुखापतीमुळे बाहेर गेल्याने तिला संधी लाभली. प्रथम फलंदाजी करताना श्री चरणीने झिम्बाब्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडत ४२ धावांत ४ बळी टिपले. तिने सलामीवीर मोडेस्टर मुपाचिकावा आणि चिपो मुगेरी-टि्रीपानो यांना बाद केले, तर नंतर न्याशा ग्वानझुरा आणि मिचेल मावुंगा यांना माघारी पाठवत भारताचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. क्रांती गौड हिने ३ बळी घेत तिला उत्तम साथ दिली. झिम्बाब्वेची फलंदाज बिला हिजा हिने एका बाजूने किल्ला लढवत ९२ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची लढाऊ खेळी केली. झिम्बाब्वेचा संघ ४९.५ षटकांत १९७ धावांत गारद झाला.
दरम्यान, क्षेत्ररक्षणात भारताकडून काही झेल सुटल्याने त्रुटी दिसून आल्या. तिसऱ्या षटकांत मुगेरीचा झेल यष्टिरक्षक रिचा घोष हिने सोडला, तर आठव्या षटकात मुपाचिकावाचा झेल स्लिपमध्ये उभा असलेल्या दीप्ती शर्माच्या हातातून निसटला.
भारत-अ संघातील राहुल, यशस्वीकडे नजरा
भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यातील चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेत ३ लढती खेळवण्यात येतील. न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेपूर्वी या सामन्यांद्वारे भारतीय संघातील काही खेळाडूंना सरावाची संधी मिळणार आहे. यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल व वॉशिंग्टन सुंदर या मालिकेत भारत-अ संघाकडून खेळतील. जुरेल संघाचे नेतृत्व करणार आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप, अंशुल कंबोजही या संघाचा भाग आहेत.