

वडोदरा : झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून २-० अशी विजयी आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय महिला संघ रविवारी मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा नऊ विकेट्स राखून धुव्वा उडवला होता. त्याआधी टी २० मालिकेतही भारताने ३-० असे निर्विवाद यश मिळवले होते.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या श्री चरणीने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २३ धावांत चार बळी मिळवले, तर प्रतिका रावलने नाबाद शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
खेळपट्टीवर फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नसतानाही चरणीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत चेंडूला अधिक फिरकी देण्यावर भर दिला. तिच्या या रणनीतीमुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना एका टोकाकडून धावा करणे कठीण झाले. या कामगिरीसह तिने एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
वेगवान गोलंदाज क्रांती गौडने तीन बळी मिळवत चरणीला चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव १९७ धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताने २२ षटकांहून अधिक षटके शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाला विविध खेळाडूंच्या जोड्या आणि संघरचनेची चाचपणी करण्याची संधी मिळत आहे. प्रतिका रावलने शुक्रवारी या संधीचा पुरेपूर फायदा घेत आक्रमक फलंदाजी करत कारकीर्दीतील तिसरे एकदिवसीय शतक झळकावले.
दुसरीकडे, झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चरणी प्रभावी गोलंदाजी करत असतानाही संयम राखला आणि ठरावीक अंतराने गडी गमावण्याचे टाळले. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये मोठ्या भागीदारीचा अभाव आणि मिळालेल्या संधींचा फायदा न उचलता येणे, या बाबी त्यांच्यासाठी चिंतेच्या आहेत. चिपो मुगेरी-तिरिपानो आणि मॉडेस्टर मुपाचिक्वा यांना पहिल्या सामन्यात मिळालेल्या संधींचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.
या दौऱ्यात चार सामन्यांत ४३ नाबाद, ९, ६० आणि ८ अशा संमिश्र धावा करणाऱ्या शार्ने मेयर्सकडून झिम्बाब्वेला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तसेच, १७ वर्षीय बेलव्हड बिझाच्या फलंदाजीवरही संघाची भिस्त असेल.
स्मृती-प्रतिकाची दमदार भागीदारी
कर्णधार स्मृती मानधनासोबत सलामीला उतरलेल्या प्रतिकाने अधिक आक्रमक फलंदाजी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. कोटांबी येथील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर त्यांनी जवळपास प्रतिषटक १० धावा काढल्या.
क्षेत्ररक्षणात सुधारणेची गरज
क्षेत्ररक्षणातील कामगिरी सुधारण्याची गरज भारताला आहे. सुरुवातीला दोन झेल सोडल्याने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना डाव सावरण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे क्षेत्ररक्षणावर अधिक भर द्यावा लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, हरलिन देओल, तेजल हसबनीस, प्रतिका रावल, सायली सातघरे, शेफाली वर्मा, क्रांती गौड, जिंतिमणी कलिता, नंदनी शर्मा, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.
झिम्बाब्वे : जोसेफिन नकोमो (कर्णधार), चिएझा धुरुरू, शार्ने मेयर्स, मॉडेस्टर मुपाचिक्वा, बेलव्हड बिझा, न्याशा ग्वान्झुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्लोव्ह, ओलिंडर चारे, कुडझाई चिगोरा, फ्रान्सिस्का चिपारे, तेंडाई मकुशा, लॉरीन फिरी, नोम्वेलो सिबांडा.
वेळ : दुपारी २ वाजता.