Asia Cup 2025: भारतीय महिला हॉकी संघाला आज जपानविरुद्ध विजय अनिवार्य

सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला शनिवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजय मिळवणे अनिवार्य आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सुपर-फोर फेरीतील अखेरच्या लढतीत भारताची जपानशी गाठ पडणार आहे. ही लढत जिंकली, तर भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
Asia Cup 2025: भारतीय महिला हॉकी संघाला आज जपानविरुद्ध विजय अनिवार्य
Published on

हांगझो (चीन) : सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला शनिवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजय मिळवणे अनिवार्य आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सुपर-फोर फेरीतील अखेरच्या लढतीत भारताची जपानशी गाठ पडणार आहे. ही लढत जिंकली, तर भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

भारताचे सुपर-फोर फेरीत २ सामन्यांत ३ गुण असून तूर्तास भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताने बुधवारी कोरियाला नमवले होते. मग गुरुवारी त्यांना चीनकडून पराभव पत्करावा लागला. चीनने सलग दोन विजयांसह ६ गुण मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. कोरिया व जपान यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. त्यामुळे दोघांच्याही खात्यात प्रत्येकी एक गुण आहे. आता भारताने जपानला नमवले, तर त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल. मात्र भारताने बरोबरी पत्करली व कोरियाने चीनला नमवले, तर कोरिया आगेकूच करेल. त्यामुळे शनिवारच्या लढतींवर लक्ष असेल.

एकीकडे बिहारमध्ये भारतीय पुरुषांनी आशिया चषक उंचावल्यावर आता चीनमध्ये भारतीय महिलासुद्धा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील, अशी आशा आहे. चीननंतर भारतीय संघ या स्पर्धेत क्रमवारीत वरच्या स्थानी आहे. या स्पर्धेतील विजेता २०२६च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहे. हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघ खेळत असून त्यांनी गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली होती. त्यावेळी त्यांनी जपानला २-२ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे आता शनिवारी भारतीय संघ जपानला नमवेल, अशी अपेक्षा आहे.

साखळी फेरीत भारताने ब-गटात ३ सामन्यांतील २ विजय व १ बरोबरीसह ७ गुण मिळवले. जपाननेसुद्धा इतक्याच गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. भारताने जपानच्या तुलनेत अधिक गोल झळकावल्याने त्यांनी अग्रस्थान पटकावले. अ-गटातून चीन व दक्षिण कोरिया यांनी सुपर-फोर फेरी गाठली. त्यामुळे आता स्पर्धेतील थरार आणखी वाढला असून भारतीय संघातील खेळाडूंचा कस लागत आहे. आता शनिवारच्या लढतीकडे लक्ष आहे.

logo
marathi.freepressjournal.in