
आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मेहुली घोष आणि शाहू तुषार माने या मिश्र जोडीच्या टीमने १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचे एक पदक पक्के केले. या टीमचा बुधवारी सुवर्णपदकाच्या लढतीत हंगेरीच्या टीमशी मुकाबला होईल.
शाहू आणि आणि मेहुली यांची जोडी ३० संघांच्या मिश्र पात्रता फेरीत अव्वल ठरली. या दोघांनी शानदार कामगिरी करताना ६० शॉटनंतर एकूण ६३४.३ गुण मिळविले. हंगेरीच्या इस्तवान पेनी आणि एस्टर मेजारोस यांच्या जोडीने ६३०.३ गुण मिळवित दुसरा क्रमांक पटकाविला.
दरम्यान, १० मीटर एअर पिस्टल मिश्र टीम स्पर्धेत शिव नरवाल आणि पलक यांच्या जोडीने पात्रता फेरीत तिसरा क्रमांक पटकावित कांस्यपदकाच्या लढतीत स्थान मिळविले. शिव आणि पलक यांनी १० मीटर एअर पिस्टल मिश्र टीम स्पर्धेत ५७४ गुण मिळविले.
अन्ना कोराकाकी आणि डियोनीसियोस कोराकाकिस या युनानच्या जोडीने ५७९ गुणांसह दुसरे स्थान मिळविले.
ऑलिम्पिक चॅम्पियन जोराना अरुनोविच आणि दामिर मिकेच ही सर्बियाची जोडी ५८४ गुणांसह अव्वल स्थानावर राहिली.