
शुभमन गिलने (९८ चेंडूंत नाबाद ९८ धावा) साकारलेली दमदार खेळी आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (४/१७) केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा ११९ धावांनी फडशा पाडला. या विजयासह भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव २६ षट्कांत अवघ्या १३७ धावांत आटोपला. निकोलस पूरन (४२) आणि बँडन किंग (४२) वगळता कोणीही त्यांच्याकडून प्रतिकार करू शकले नाहीत. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून चहलला उत्तम साथ दिली. गिलने मालिकेत सर्वाधिक २०५ धावा केल्यामुळे त्याला सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, गिलने सात चौकार आणि दोन षट्कार लगावताना कर्णधार शिखर धवनसह ११३ धावांची सलामी दिली. धवन मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावून ५८ धावांवर बाद झाल्यावर श्रेयस अय्यरसह गिलने दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भर घातली. श्रेयसला (४४) सलग तिसऱ्या अर्धशतकाने हुलकावणी दिली. तर सूर्यकुमार यादव (८) स्वस्तात माघारी परतला. गिल पहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने भारताचा डाव ३६ षट्कांनंतरच थांबवण्यात आला. दरम्यान, विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश संपादन करून भारताने जागतिक क्रमवारीत ११० गुणांसह तिसरे स्थान कायम राखले.