आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारत विजयी,युझवेंद्र चहल ठरला सामनावीर

११ धावांच्या मोबदल्यात एक बळी टिपून प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले
आयर्लंडविरुद्धच्या  टी-२० सामन्यात भारत विजयी,युझवेंद्र चहल ठरला सामनावीर

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना सात विकेट्सने जिंकला. हार्दिकने नाणेफक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू झाला. भारताने मालिकेत १-०ने आघाडी घेतली. तीन षट्कांत ११ धावांच्या मोबदल्यात एक बळी टिपून प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी-२० सामना पावसामुळे १२ षट्कांचा खेळविण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडने १२ षट्कांत चार गडी गमावून १०८ धावा केल्या. भारताने विजयी लक्ष्य ९.२ षट्कांत तीन गडी गमावून साध्य केले. दीपक हुडाला सलामीला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले; परंतु त्याने शानदार खेळी केली. २९ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षट्कार लगावत नाबाद ४७ धावा केल्या. ईशान किशनने ११ चेंडूंत २६ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने १२ चेंडूत २४ धावांची खेळी केली.

दरम्यान, सलामीला ईशान किशन आणि ऋतुराज ऐवजी दीपक हुडा मैदानात उतरल्याने उलटसुलट चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in