भारताच्या वाट्याला १८ कसोटी! आयसीसीकडून २०२५-२७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) २०२३-२५चे विजेतेपद मिळवून आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यानंतर आता सर्वांना २०२५-२७च्या आगामी दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसीचे वेध लागले आहेत. या कार्यकाळात भारतीय संघाच्या वाट्याला १८ कसोटी सामने येणार आहेत.
भारताच्या वाट्याला १८ कसोटी! आयसीसीकडून २०२५-२७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
Photo - SportsTak
Published on

मुंबई : दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) २०२३-२५चे विजेतेपद मिळवून आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यानंतर आता सर्वांना २०२५-२७च्या आगामी दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसीचे वेध लागले आहेत. या कार्यकाळात भारतीय संघाच्या वाट्याला १८ कसोटी सामने येणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवा कर्णधार शुभमन गिल यांची जोडी भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात यशस्वी ठरणार का, याकडे लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रविवारी पुढील दोन वर्षांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली.

आयसीसीने २०१९ पासून कसोटीमध्येही जागतिक पातळीवरील स्पर्धा सुरू केली. त्यापूर्वी वर्षाच्या अखेरीस जो संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असायचा, त्याला मानाची गदा देण्यात यायची. मात्र २०१९पासून कसोटीतील जगज्जेतेपदासाठी सुरू केलेल्या या संग्रामास चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येते. यामध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानात ३, तर परदेशात ३ कसोटी मालिका खेळतो. मालिकेतील सामन्यांची संख्या मात्र वेगवेगळी असू शकते.

साखळी फेरीच्या अखेरीस टक्केवारीनुसार गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. २०१९-२०२१ या कालावधीत भारत-न्यूझीलंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडने भारताला अंतिम फेरीत धूळ चारून पहिला जागतिक कसोटी विजेता ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर २०२१-२०२३ या कालावधीतही भारताने अंतिम फेरी धडक मारली. मात्र यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली, कारण ऑस्ट्रेलियाने त्यांना अंतिम सामन्यात नेस्तनाबूत केले. त्यानंतर शनिवारीच झालेल्या २०२३-२५च्या हंगामातील अंतिम लढतीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारून जेतेपद पटकावले.

आता १७ जूनपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेद्वारे आगामी डब्ल्यूटीसी हंगामाला प्रारंभ होईल. दुसरीकडे गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच २५ जूनपासून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका विंडीजमध्ये सुरू होईल. त्यामुळे एकंदरच आता दोन वर्षांच्या या मालिकेची सर्व संघ नव्या जोमाने सुरुवात करण्यास आतुर असतील.

भारतीय संघ पुढील दोन वर्षभरात १८ कसोटी सामने खेळणार आहे. त्यांपैकी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारतीय संघ घरच्या मैदानात सामने खेळणार आहे. विंडीज व आफ्रिकेविरुद्ध भारताचे प्रत्येकी २ कसोटी सामने होतील, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तब्बल ५ कसोटी लढतींचा समावेश असेल. विदेशी दौऱ्यांचा विचार करता इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटींनंतर भारतीय संघ २०२६मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघांविरुद्ध भारताचे प्रत्येकी २ सामने होतील. अशाप्रकारे मार्च २०२७च्या आधी भारताचे १८ कसोटी सामने होतील. त्यावेळी टक्केवारीनुसार भारतीय संघ अव्वल दोन संघांत असला, तर ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. एकूण ९ संघांचा डब्ल्यूटीसीमध्ये समावेश आहे. मात्र त्यापैकी भारत सहा संघांविरुद्धच खेळणार आहे. बांगलादेश व पाकिस्तानशी भारताचे सामने होणार नाहीत.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध भारतातच ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारताने ३-१ असा मालिका पराभव पत्करला. त्यामुळे यंदा भारताला प्रथमच अंतिम फेरी गाठता आली नाही.

दरम्यान, या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वाधिक २२ कसोटी खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडच्या वाट्याला २१ लढती येतील. त्यानंतर भारत (१८), न्यूझीलंड (१६), आफ्रिका (१४) यांचा अनुक्रमे क्रमांक लागतो. वेस्ट इंडिज व बांगलादेशच्या वाट्याला २ वर्षांत फक्त १२ कसोटी आहेत. आफ्रिका संघ ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेद्वारे आपल्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. त्यामुळे एकंदरच आता डब्ल्यूटीसी २०२५-२७ची उत्सुकता लागून आहे.

भारताचे सामने

  • एकूण लढती : १८

  • मायदेशात : ९ (२ वि. वेस्ट इंडिज, २ वि. दक्षिण आफ्रिका, ५ वि. ऑस्ट्रेलिया)

  • परदेशात : ९ (५ वि. इंग्लंड, २ वि. श्रीलंका, २ वि. न्यूझीलंड)

न्यूझीलंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर

न्यूझीलंडचा पुरुष क्रिकेट संघ जानेवारी महिन्यात टी-२० व एकदिवसीय मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ११ जानेवारीपासून उभय संघांत तीन एकदिवसीय सामने होतील. अनुक्रमे बडोदा, राजकोट व इंदूर येथे या लढती होतील. मुख्य म्हणजे बडोदा येथे १५ वर्षांनी प्रथमच भारतीय पुरुष संघाचा आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. २०१०मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातच या मैदानात अखेरची आंतररष्ट्रायी लढत झाली होती. त्यानंतर २१ जानेवारीपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल. नागपूर, रायपूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम येथे या लढती होतील.

विजयी मिरवणुकांसाठी आता विशेष समिती

बंगळुरूने आयपीएलचे जेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरूत निघालेल्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याने ११ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात यांसारख्या घटना टाळण्यासाठी बीसीसीआयने विशेष त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजित साइकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार प्रभजेत सिंग यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पुढील १५ दिवसांत भविष्यातील विजयी मिरवणुकांबाबत कार्यप्रणाली आखणार आहे. त्यानुसारच आयपीएलमधील संघ व भारतीय संघाला भविष्यातील जेतेपदांबाबत विजयी मिरवणूक काढावी लागेल.

logo
marathi.freepressjournal.in